YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 22:1-9

१ राजे 22:1-9 MARVBSI

अरामी लोक व इस्राएल लोक ह्यांच्यामध्ये तीन वर्षे लढाई झाली नाही. तिसर्‍या वर्षी यहूदाचा राजा यहोशाफाट इस्राएलाच्या राजाकडे आला. तेव्हा इस्राएलाचा राजा आपल्या सेवकांना म्हणाला, “रामोथ-गिलाद आपलेच आहे हे तुम्हांला ठाऊक आहे काय? तर आपण स्वस्थ का राहावे? ते अरामाच्या राजापासून हिसकावून का घेऊ नये?” तो यहोशाफाटास म्हणाला, “रामोथ-गिलाद येथे लढायला आपण माझ्याबरोबर याल काय?” त्याला यहोशाफाटाने उत्तर दिले, “मी आणि आपण एकच; माझे लोक ते आपलेच व माझे घोडे ते आपलेच.” यहोशाफाटाने इस्राएलाच्या राजाला म्हटले, “आज परमेश्वराचा आदेश विचारून घे.” इस्राएलाच्या राजाने सुमारे चारशे संदेष्टे जमवून त्यांना विचारले, “मी रामोथ-गिलादावर चढाई करून जाऊ का नको?” त्यांनी उत्तर दिले, “चढाई करून जा; प्रभू ते महाराजांच्या हाती देईल.” तेव्हा यहोशाफाटाने विचारले, “ह्याच्याखेरीज दुसरा कोणीतरी परमेश्वराचा संदेष्टा नाही काय? त्याला आम्ही प्रश्‍न विचारू.” इस्राएलाचा राजा यहोशाफाटास म्हणाला, “ज्याच्या द्वारे परमेश्वराचा सल्ला घेता येईल असा आणखी एक मनुष्य आहे, पण मला त्याचा तिरस्कार वाटतो; कारण मला अनुकूल असा संदेश तो कधीही देत नाही, प्रतिकूल तेवढाच देतो; तो इम्लाचा पुत्र मीखाया होय.” यहोशाफाट म्हणाला, “महाराजांनी असे बोलू नये.” तेव्हा इस्राएलाच्या राजाने एका कारभार्‍यास बोलावून सांगितले, “लवकर जाऊन इम्लाचा पुत्र मीखाया ह्याला घेऊन ये.”