YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 21:1-16

१ राजे 21:1-16 MARVBSI

वरील गोष्टीनंतर असे झाले की इज्रेलकर नाबोथ ह्याचा द्राक्षमळा इज्रेल येथे शोमरोनचा राजा अहाब ह्याच्या राजवाड्याजवळ होता. अहाब नाबोथास म्हणाला, “तुझा द्राक्षमळा माझ्या वाड्यानजीक आहे, तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन; त्याच्याऐवजी मी तुला त्याहून चांगला द्राक्षमळा देतो किंवा तुझी इच्छा असल्यास मी तुला त्याचे पैसे देतो.” नाबोथ अहाबाला म्हणाला, “माझ्या वाडवडिलांचे वतन मी आपणाला द्यावे असे परमेश्वर माझ्या हातून न घडवो.” “मी आपल्या वाडवडिलांचे वतन तुला देणार नाही,” असे इज्रेलकर नाबोथ म्हणाला, म्हणून अहाब उदास व खिन्न होऊन आपल्या घरी गेला. तो जाऊन बिछान्यावर पडला आणि आपले तोंड फिरवून अन्न सेवन करीना. तेव्हा त्याची स्त्री ईजबेल ही त्याच्याकडे येऊन विचारू लागली, “आपण अन्न सेवन करीत नाही, इतके आपले मन का खिन्न झाले आहे?” तो तिला म्हणाला, “इज्रेलकर नाबोथ ह्याला मी म्हणालो की, ‘पैसे घेऊन मला तुझा द्राक्षमळा दे, अथवा तुला पसंत वाटल्यास मी त्याच्याऐवजी तुला दुसरा द्राक्षमळा देतो’; ह्यावर तो म्हणाला, ‘मी आपला द्राक्षमळा तुला देणार नाही.”’ त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली, “सांप्रत इस्राएलावर तुमची राजसत्ता आहे ना! चला, उठा, अन्न सेवन करा, तुमचे मन आनंदित करा; इज्रेलकर नाबोथाचा द्राक्षमळा मी तुम्हांला मिळवून देते.” मग तिने अहाबाच्या नावाने पत्रे लिहिली व त्यांवर त्याची मुद्रा केली; आणि नाबोथ राहत होता त्या गावात त्याच्या शेजारी राहणारे वडील जन व सरदार ह्यांच्याकडे ती रवाना केली. तिने पत्रात ह्याप्रमाणे लिहिले, “उपवासाचा जाहीरनामा काढा व नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवा; आणि दोन अधम माणसे त्याच्यासमोर बसवा; ‘त्याने देवाचा व राजाचा धिक्कार केला’ अशी साक्ष त्या दोघांनी द्यावी; मग गावाबाहेर नेऊन त्याला मरेपर्यंत दगडमार करावा.” ईजबेलीच्या पत्रातील आज्ञेप्रमाणे त्या गावात राहणार्‍या वडील जनांनी व सरदारांनी केले. त्यांनी उपवासाचा जाहीरनामा काढला, आणि नाबोथाला लोकांसमोर उच्च स्थानी बसवले. दोन अधम पुरुष येऊन त्याच्यासमोर बसले; त्या अधम पुरुषांनी लोकांसमक्ष नाबोथाविरुद्ध साक्ष दिली; ते म्हणाले, “नाबोथाने देवाचा व राजाचा धिक्कार केला आहे.” ह्यानंतर त्यांनी त्याला नगराबाहेर नेऊन तो मरेपर्यंत दगडमार केला. त्यांनी ईजबेलीस सांगून पाठवले की, “नाबोथाला दगडमार केला व तो मेला.” नाबोथाला दगडमार होऊन तो मेला हे ईजबेलीने ऐकले तेव्हा ती अहाबाला म्हणाली, “उठा, जो द्राक्षमळा इज्रेलकर नाबोथ पैसे घेऊन तुम्हांला देण्यास कबूल नव्हता तो ताब्यात घ्या. नाबोथ आता जिवंत नाही, मेला आहे.” इज्रेलकर नाबोथ मरण पावला हे अहाबाने ऐकले तेव्हा तो त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला जाण्यासाठी उठला.