YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 20:23-43

१ राजे 20:23-43 MARVBSI

अरामाच्या राजाचे सेवक त्याला म्हणाले, “त्यांचे देव पहाडी देव आहेत; म्हणूनच ते आमच्यावर प्रबळ झाले; तर आता सपाटीवर आपण त्यांच्याशी युद्ध करू म्हणजे आपण खातरीने त्यांच्यावर प्रबळ होऊ. आता एवढे मात्र करा, राजांना काढून टाका, प्रत्येकाला त्याच्या जागेवरून दूर करा; आणि त्यांच्या जागी सुभेदार नेमा; आणि आपले जे सैन्य जायबंदी झाले तेवढ्याची घोड्यास घोडा, रथास रथ अशी भरती करा; मग आपण सपाटीवर त्यांच्याशी युद्ध करू व आपण त्यांच्यावर खातरीने प्रबळ होऊ.” त्यांची ही मसलत मान्य करून बेन-हदादाने तसे केले. नवीन वर्ष लागताच बेन-हदाद अरामी लोक एकवट करून इस्राएलाशी लढण्यासाठी अफेक येथे गेला. इकडे इस्राएल लोकही एकवट होऊन व अन्नसामग्रीचा पुरवठा करून त्यांच्याशी सामना करायला गेले; इस्राएल लोकांनी त्यांच्यासमोर तळ दिला; ते बकर्‍यांच्या दोन कळपांसारखे भासले, पण अरामी लोकांनी देश व्यापून टाकला. तेव्हा देवाच्या माणसाने इस्राएलाच्या राजाकडे जाऊन सांगितले, “परमेश्वर असे म्हणतो, ‘परमेश्वर हा पहाडी देव आहे, तळवटीचा देव नाही’ असे अरामी लोक म्हणाले आहेत, ह्यास्तव हा सर्व मोठा समुदाय मी तुझ्या हाती देतो; मग मी परमेश्वर आहे अशी तुम्हांला जाणीव होईल.”’ सात दिवस ते एकमेकांसमोर तळ देऊन राहिले; सातव्या दिवशी लढाई सुरू झाली; तेव्हा इस्राएल लोकांनी एका दिवसात एक लक्ष अरामी पायदळाचा संहार केला. उरलेले लोक अफेक शहराकडे पळून जाऊन त्यात शिरले; तेव्हा शहराचा तट कोसळून त्यांच्यातल्या सत्तावीस हजार लोकांवर पडला. बेन-हदादही पळून व नगरातल्या एका घरातल्या आतल्या खोलीत लपून राहिला. त्याचे सेवक त्याला म्हणाले, “पाहा, आम्ही असे ऐकतो की इस्राएल घराण्याचे राजे दयाळू असतात; तर आमच्या कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्‍या बांधून आम्हांला इस्राएलाच्या राजाकडे जाऊ द्या; तो कदाचित आपला प्राण वाचवील.” त्याप्रमाणे ते कंबरांना गोणपाट गुंडाळून व गळ्यांत दोर्‍या बांधून इस्राएलाच्या राजाकडे जाऊन म्हणाले, “आपला दास बेन-हदाद म्हणतो, मला जीवदान द्यावे.” राजा म्हणाला, “तो अजून जिवंत आहे काय? तो तर माझा बंधू आहे.” हा शुभशकुन समजून त्यांनी त्याच्या मनात काय आहे ते समजण्यासाठी त्याचे शब्द चटकन झेलून म्हटले, “आपला बंधू बेन-हदाद!” राजा त्यांना म्हणाला, “जा, त्याला घेऊन या.” बेन-हदाद त्याच्याकडे आल्यावर त्याने त्याला आपल्या रथात घेतले. बेन-हदाद त्याला म्हणाला, “जी नगरे माझ्या बापाने आपल्या बापापासून घेतली ती मी परत देतो; माझ्या बापाने शोमरोनात पेठा वसवल्या तशाच आपणही दिमिष्कात आपल्या नावाच्या पेठा वसवा;” अहाब म्हणाला, “ह्या शर्तींवर तुला सोडून देतो,” त्याने बेन-हदादाशी करारमदार करून त्याला सोडून दिले. त्यानंतर संदेष्ट्यांच्या शिष्यांपैकी एक जण परमेश्वराच्या स्फूर्तीने आपल्या सोबत्याला म्हणाला, “मला मार.” पण तो मनुष्य त्याला मारायला कबूल होईना. मग तो त्याला म्हणाला, “तू परमेश्वराचे वचन मानले नाहीस तर पाहा, माझ्याकडून तू जाताच सिंह तुला मारून टाकील.” तो त्याच्याकडून जाताच त्याला एका सिंहाने गाठून फाडून टाकले. त्या शिष्याला दुसरा मनुष्य भेटला; त्याला तो म्हणाला, “मला मार.” त्या मनुष्याने त्याला मारून घायाळ केले. मग तो संदेष्टा चालता झाला, आणि आपले डोके पागोट्याच्या पदराने झाकून राजाची मार्गप्रतीक्षा करीत रस्त्यात उभा राहिला. राजा जवळून जात असताना त्याने त्याला हाक मारून म्हटले, “आपला सेवक रणभूमीवर गेला होता तेव्हा एक मनुष्य दुसर्‍या एका मनुष्याला घेऊन माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘ह्या मनुष्याला सांभाळ; जर का हा नाहीसा झाला तर तुझा जीव त्याच्या जिवाचा मोबदला होईल, नाहीतर तुला शंभर रत्तल रुपे दंड होईल.’ आपला सेवक इकडे तिकडे कामात गुंतला असता तो निसटून गेला.” इस्राएलाच्या राजाने त्याला म्हटले, “तोच तुझा न्याय; तू आपल्याच तोंडाने निर्णय केलास.” त्या संदेष्ट्याने आपल्या डोक्यांवरचा पागोट्याचा पदर चटकन काढला; तेव्हा हा कोणी संदेष्टा आहे असे इस्राएलाच्या राजाने ओळखले. तो राजाला म्हणाला, “परमेश्वर असे म्हणतो, ज्या मनुष्याचा नाश मी योजला होता तो मनुष्य तू आपल्या हातचा जाऊ दिलास तर त्याच्या प्राणाबद्दल तुझा प्राण जाईल व त्याच्या लोकांबद्दल तुझे लोक जातील.” मग इस्राएलाचा राजा उदास व खिन्न होऊन शोमरोनास आपल्या घरी गेला.