YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ राजे 18:1-16

१ राजे 18:1-16 MARVBSI

पुष्कळ दिवस लोटल्यावर, तिसरे वर्ष लागले तेव्हा एलीयाला परमेश्वराचे वचन प्राप्त झाले की, “जा, अहाबाच्या दृष्टीस पड; मी पृथ्वीवर पर्जन्यवृष्टी करणार आहे.” त्याप्रमाणे अहाबाच्या दृष्टीस पडावे म्हणून एलीया निघाला. त्या वेळी शोमरोनात भयंकर दुष्काळ होता. अहाबाने आपला घरकारभारी ओबद्या ह्याला बोलावणे पाठवले; हा ओबद्या परमेश्वराला फार भिऊन वागत असे. ईजबेल परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध करीत होती तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवले व त्यांना अन्नपाणी पुरवले. अहाब ओबद्यास म्हणाला, “देशात फिरून पाण्याचे झरे, नाले असतील ते सर्व शोधून पाहा; घोडे व खेचरे ह्यांचा जीव वाचवण्यापुरते गवत कोठेतरी कदाचित मिळेल व अशाने आमची सगळी जनावरे मरणार नाहीत.” सगळा देश धुंडाळावा म्हणून त्यांनी तो आपसात वाटून घेतला; एका मार्गाने अहाब गेला व दुसर्‍या मार्गाने ओबद्या गेला. ओबद्या वाट चालत असता एलीया त्याला भेटला; त्याने त्याला ओळखले आणि दंडवत घालून त्याला म्हटले, “माझे स्वामी एलीया ते आपणच काय?” तो म्हणाला, “होय, तोच मी; जा, आपल्या धन्याला सांग की, एलीया आला आहे.” तो म्हणाला, “मला आपल्या दासाला मारून टाकण्यासाठी अहाबाच्या हाती आपण देऊ पाहता असा मी काय अपराध केला आहे? आपला देव परमेश्वर ह्याच्या जीविताची शपथ, माझ्या धन्याने आपला शोध करण्यासाठी जेथे लोक पाठवले नाहीत असे एकही राष्ट्र किंवा राज्य उरले नाही; तो अमुक ठिकाणी नाही असे त्यांनी येऊन सांगितले म्हणजे एलीया त्यांना आढळला नाही अशी शपथ तो त्या त्या राज्यास व राष्ट्रास घ्यायला लावी. आणि आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे तू जाऊन आपल्या धन्याला सांग. मी आपल्याकडून जाताच मला कळणार नाही अशा ठिकाणी परमेश्वराचा आत्मा आपणाला घेऊन जाईल; आणि मी जाऊन अहाबाला हे वर्तमान सांगितले व आपण त्याला आढळला नाहीत तर तो मला मारून टाकील. मी आपला दास तर बाळपणापासून परमेश्वराला भिऊन वागत आलो आहे. ईजबेलीने परमेश्वराच्या संदेष्ट्यांचा वध केला तेव्हा मी परमेश्वराचे शंभर संदेष्टे नेऊन एका गुहेत पन्नास व दुसर्‍या गुहेत पन्नास असे लपवून ठेवले व त्यांना अन्नपाणी पुरवले, हे वर्तमान माझ्या स्वामींच्या कानी आले नाही काय? आता आपण मला सांगता की, ‘एलीया आला आहे’ असे जाऊन आपल्या धन्यास सांग; पण तो माझा वध करील.” एलीया म्हणाला, “ज्या सेनाधीश परमेश्वराच्या हुजुरास मी असतो, त्याच्या जीविताची शपथ आज मी खात्रीने त्याच्या नजरेस पडेन.” तेव्हा ओबद्याने अहाबाची भेट घेऊन त्याला हे वर्तमान सांगितले; तेव्हा अहाब एलीयाला भेटायला गेला.