परमेश्वराच्या नामासंबंधाने शलमोनाची कीर्ती झाली ती ऐकून शबाची राणी कूट प्रश्नांनी त्याची परीक्षा पाहायला आली. ती आपल्याबरोबर मोठा लवाजमा घेऊन आणि विपुल सोने, मोलवान रत्ने व मसाले उंटांवर लादून यरुशलेमेस आली. शलमोनाकडे आल्यावर आपल्या मनात जे काही होते ते सर्व ती त्याच्यापुढे बोलली. शलमोनाने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; त्याने तिला उलगडा करून सांगितली नाही अशी एकही गोष्ट नव्हती. शलमोनाचे सगळे शहाणपण, त्याने बांधलेले मंदिर, त्याच्या मेजवानीतील पक्वान्ने, त्याच्या कामदारांची आसने, त्याच्या मानकर्यांची खिदमत व त्यांचे पोशाख, त्याचे प्यालेबरदार व परमेश्वराच्या मंदिरात चढून जायचा त्याचा तो जिना हे सगळे पाहून शबाची राणी गांगरून गेली. ती राजाला म्हणाली, “आपली करणी व ज्ञान ह्यांविषयीची जी कीर्ती मी आपल्या देशात ऐकली ती खरी आहे. तथापि मी येऊन प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिल्याशिवाय ह्या गोष्टींचा मला विश्वास येईना; आता पाहते तर माझ्या कानी आले ते अर्धेही नव्हते. आपले शहाणपण व समृद्धी ह्यांची कीर्ती झाली आहे तिच्याहून ती अधिक आहेत. आपले लोक धन्य होत; हे आपले सेवक, ज्यांना आपणासमोर सतत उभे राहून आपल्या शहाणपणाचा लाभ होत असतो ते धन्य होत. ज्याने आपणावर प्रसन्न होऊन आपणाला इस्राएलाच्या गादीवर स्थापले आहे तो आपला देव परमेश्वर धन्य होय; परमेश्वर इस्राएलांवर सर्वदा प्रेम करतो म्हणून न्यायाचे व नीतीचे पालन करण्यासाठी त्याने आपणाला राजा केले आहे.” तिने राजाला एकशेवीस किक्कार सोने, विपुल सुगंधी द्रव्ये व बहुमोल रत्ने नजर केली; शबाच्या राणीने शलमोन राजाला एवढी सुगंधी द्रव्ये नजर केली की तेवढी पुन्हा कधी कोठून आली नाहीत. हीरामाची जहाजे ओफीर येथून सोने आणत त्याचप्रमाणे रक्तचंदनाचे लाकूड आणि बहुमोल रत्नेही विपुल आणत. राजाने रक्तचंदनाच्या लाकडाचे परमेश्वराच्या मंदिराला व राजवाड्याला कठडे केले; त्याचप्रमाणे गाणार्यांसाठी त्याच्या वीणा व सारंग्या बनवल्या; असले रक्तचंदनाचे लाकूड आजवर आले नाही की दृष्टीस पडले नाही. शलमोनाने राजाला अनुरूप अशा औदार्याने जे तिला दिले त्याशिवाय आणखी तिने जे जे मागितले ते ते सगळे तिला देऊन तिची इच्छा पुरवली. मग ती आपल्या परिवारासह स्वदेशी परत गेली.
१ राजे 10 वाचा
ऐका १ राजे 10
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ राजे 10:1-13
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ