YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 7:17-40

१ करिंथ 7:17-40 MARVBSI

तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे, जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे; आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळ्यांना नियम लावून देतो. सुंता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता न झालेला असे होऊ नये. कोणा सुंता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय? तर त्याने सुंता करून घेऊ नये. सुंता होणे काही नाही व सुंता न होणेही काही नाही; तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्वकाही आहे. ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे. तू गुलाम असता तुला पाचारण झाले काय? त्याची चिंता करू नकोस; पण तुला मोकळे होता येत असेल तर खुशाल मोकळा हो. कारण गुलाम असून ज्याला प्रभूमध्ये पाचारण झाले, तो गुलामगिरीतून मोकळा केलेला प्रभूचा मनुष्य आहे; तसेच मोकळे असताना ज्याला पाचारण झाले तो ख्रिस्ताचा दास आहे. तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात; माणसांचे गुलाम होऊ नका. बंधुजनहो, ज्या स्थितीत कोणाला पाचारण झाले असेल त्या स्थितीतच तो देवाजवळ राहो. कुमारिकांविषयी मला प्रभूची आज्ञा नाही, तथापि ज्या माझ्यावर विश्वासू होण्याची दया प्रभूकडून झाली आहे तो मी आपले मत सांगतो. ते असे की, प्रस्तुतच्या अडचणीमुळे जो ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत त्याने राहावे हे माणसाला बरे. तू पत्नीला बांधलेला आहेस काय? असलास तर मुक्त होण्यास पाहू नकोस; पत्नीपासून मुक्त आहेस काय? असलास तर पत्नी करण्यास पाहू नकोस. तथापि तू लग्न केलेस म्हणून पाप केलेस असे होत नाही. तसेच कुमारिकेने लग्न केले म्हणून तिने पाप केले असे होत नाही; तरीपण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हांला भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. बंधुजनहो, मी हेच म्हणतो की, काळाचा संक्षेप करण्यात आला आहे, ह्यासाठी की, ज्याला ज्याला पत्नी आहे त्याने त्याने ह्यापुढे ती नसल्यासारखे असावे; जे रडतात त्यांनी रडत नसल्यासारखे; जे आनंद करतात त्यांनी आनंद करत नसल्यासारखे; जे विकत घेतात त्यांनी आपल्याजवळ काही नसल्यासारखे; आणि जे ह्या जगाचा उपयोग करतात त्यांनी त्याचा उपयोग पूर्णपणे करत नसल्यासारखे असावे; कारण ह्या जगाचे बाह्य स्वरूप लयास जात आहे. तुम्ही निश्‍चिंत असावे अशी माझी इच्छा आहे. अविवाहित पुरुष, प्रभूला कसे संतोषवावे अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करतो; परंतु विवाहित पुरुष आपल्या पत्नीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयी चिंता करतो. येणेकरून त्याचे मन द्विधा झालेले असते. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेही पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयीची चिंता करते; परंतु जी विवाहित आहे ती आपण आपल्या पतीला कसे संतोषवावे अशी जगाच्या गोष्टींविषयीची चिंता करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो; तुम्हांला फासात गुंतवावे म्हणून नव्हे तर तुमच्या हातून उत्तम आचरण व प्रभूची सेवा एकाग्रतेने व्हावी म्हणून सांगतो. परंतु जर कोणाला असे वाटते की, आपण आपल्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे; तो पाप करत नाही; त्यांनी लग्न करावे. तथापि जो अंतःकरणाने स्थिर आहे, ज्याला अगत्य नाही, ज्याचा आपल्या इच्छेवर ताबा आहे, आणि आपल्या कुमारिकेला तसेच ठेवावे असे ज्याने आपल्या अंतःकरणात ठरवले आहे, तो बरे करतो. जो आपल्या कुमारिकेचे लग्न करून देतो तो बरे करतो; पण जो लग्न करून देत नाही तो अधिक बरे करतो. पती जिवंत आहे तोपर्यंत पत्नी बांधलेली आहे; पती मेल्यावर तिची इच्छा असेल त्याच्याबरोबर, पण केवळ प्रभूमध्ये, लग्न करायला ती मोकळी आहे. पण जर ती तशीच राहील तर माझ्या समजुतीप्रमाणे ती अधिक सुखी होईल; आणि मलाही देवाचा आत्मा आहे असे मला वाटते.