YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 7:1-16

१ करिंथ 7:1-16 MARVBSI

तुम्ही मला ज्या बाबींविषयी लिहिले त्यांविषयी: पुरुषाने स्त्रीला शिवू नये हे त्याला बरे. तरी जारकर्मे होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला स्वत:ची पत्नी असावी, आणि प्रत्येक स्त्रीला स्वत:चा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा आणि त्याप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो अधिकार तिच्या पतीला आहे; आणि त्याप्रमाणे पतीलाही स्वत:च्या शरीरावर अधिकार नाही तर तो त्याच्या पत्नीला आहे. एकमेकांशी वंचना करू नका, तरी उपास व प्रार्थनेसाठी प्रसंग मिळावा म्हणून पाहिजे असल्यास काही वेळ परस्पर संमतीने एकमेकांपासून दूर राहा. मग पुन्हा एकत्र व्हा, अशा हेतूने की, तुमच्या असंयमामुळे सैतानाने तुम्हांला परीक्षेत पाडू नये. तरी मी हे आज्ञा म्हणून सांगत नाही, तर सवलत म्हणून सांगतो. पण मी जसा आहे तसे सर्व माणसांनी असावे अशी माझी इच्छा आहे; तरी प्रत्येकाला ज्याचे-त्याचे कृपादान देवापासून मिळाले आहे, एकाला एका प्रकारचे व दुसर्‍याला दुसर्‍या प्रकारचे. जे अविवाहित व ज्या विधवा आहेत त्यांना मी म्हणतो की, तुम्ही माझ्यासारखे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे. तथापि जर त्यांना संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे, कारण वासनेने जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. परंतु ज्यांनी लग्न केले आहे त्यांना मी आज्ञा करतो, मी नव्हे तर प्रभू करतो की, पत्नीने पतीपासून वेगळे होऊ नये; परंतु ती वेगळी झालीच तर तिने लग्न केल्यावाचून राहावे किंवा पतीबरोबर समेट करावा आणि पतीनेही पत्नीला सोडू नये. इतरांना, प्रभू नव्हे तर मी म्हणतो की, जर कोणाएका बंधूची पत्नी ख्रिस्तीतर1 असली, आणि ती त्याच्याजवळ नांदायला राजी असली, तर त्याने तिला सोडू नये. आणि ज्या स्त्रीचा पती ख्रिस्तीतर2 असून तिच्याजवळ राहायला राजी असेल तर त्याला तिने सोडू नये. कारण पत्नीच्या द्वारे ख्रिस्तीतर पती पवित्र झाला आहे आणि ख्रिस्ती पतीच्या द्वारे ख्रिस्तीतर पत्नी पवित्र झाली आहे; असे नसते तर तुमची मुलेबाळे अशुद्ध असती; परंतु आता ती पवित्र आहेत. तथापि जर ख्रिस्तीतर व्यक्ती वेगळी होऊ पाहते तर ती वेगळी होवो; अशा प्रसंगी भाऊ किंवा बहीण बांधलेली नाही; देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरता पाचारण केले आहे. कारण हे पत्नी, तू आपल्या पतीला तारशील किंवा नाही हे तुला काय ठाऊक? हे पती, तू आपल्या पत्नीला तारशील किंवा नाही हे तुलाही काय ठाऊक?