बंधुजनहो, जी सुवार्ता मी तुम्हांला सांगितली, जिचा तुम्ही स्वीकार केलात, जिच्यात तुम्ही स्थिरही राहत आहात;
जिच्या द्वारे तुमचे तारण होत आहे,1 तीच सुवार्ता मी तुम्हांला कळवतो. ज्या वचनाने मी तुम्हांला ही सुवार्ता सांगितली त्या वचनानुसार ती तुम्ही दृढ धरली असेल; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.2
कारण मला जे सांगण्यात आले ते मी तुम्हांला सांगून टाकले, त्यांपैकी मुख्य हे की,3 शास्त्राप्रमाणे ख्रिस्त तुमच्या-आमच्या पापांबद्दल मरण पावला;
तो पुरला गेला; शास्त्राप्रमाणे तिसर्या दिवशी त्याला पुन्हा उठवण्यात आले;
आणि तो केफाला, मग बारा जणांना दिसला.
त्यानंतर तो एकदम पाचशेपेक्षा अधिक बंधूंना दिसला; त्यांच्यातील बहुतेक आजपर्यंत हयात आहेत, आणि कित्येक महानिद्रा घेत आहेत.
त्यानंतर तो याकोबाला, मग सर्व प्रेषितांना दिसला;
आणि जणू काय अकाली जन्मलेला जो मी, त्या मलाही सर्वांच्या शेवटी दिसला.
कारण प्रेषितांत मी कनिष्ठ आहे; प्रेषित म्हणवायला मी योग्य नाही, कारण मी देवाच्या मंडळीचा छळ केला.
तरी जो काही मी आहे तो देवाच्या कृपेने आहे आणि माझ्यावर त्याची जी कृपा झाली आहे ती व्यर्थ झाली नाही; परंतु ह्या सर्वांपेक्षा मी अतिशय श्रम केले, ते मी केले असे नाही, तर माझ्याबरोबर असणार्या देवाच्या कृपेने केले.
सारांश, मी असो किंवा ते असोत, आम्ही अशीच घोषणा करतो आणि तुम्ही असाच विश्वास धरला.
आता ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहे अशी त्याच्याविषयी घोषणा होत आहे, तर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही, असे तुमच्यापैकी कित्येक जण म्हणतात हे कसे?
जर मेलेल्यांचे पुनरुत्थान नाही तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;
आणि ख्रिस्त उठवला गेला नाही तर आमची घोषणा व्यर्थ व तुमचा विश्वासही व्यर्थ.
आणि आम्ही देवासंबंधाने खोटे साक्षी असे ठरलो; कारण देवासंबंधाने आम्ही अशी साक्ष दिली की, त्याने ख्रिस्ताला उठवले; पण मेलेले उठवलेच जात नाहीत तर मग त्याने त्याला उठवले नाही.
कारण मेलेले उठवले जात नसतील तर ख्रिस्तही उठवला गेला नाही;
आणि ख्रिस्त उठवला गेला नसेल तर तुमचा विश्वास निष्फळ; तुम्ही अजून आपल्या पापांतच आहात.
आणि ख्रिस्तामध्ये जे महानिद्रा घेत आहेत त्यांचाही नाश झाला आहे.
आपण ह्या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत.
तरीपण ख्रिस्त मेलेल्यांतून उठवला गेला आहेच; तो महानिद्रा घेणार्यांतले प्रथमफळ असा आहे.
कारण मनुष्याच्या द्वारे मरण आले, म्हणून मनुष्याच्या द्वारे मेलेल्यांचे पुनरुत्थानही आले आहे.
कारण जसे आदामामध्ये सर्व मरतात तसे ख्रिस्तामध्ये सर्व जिवंत केले जातील;
पण प्रत्येक आपापल्या क्रमाप्रमाणे, प्रथमफळ ख्रिस्त; मग जे ख्रिस्ताचे ते त्याच्या आगमनकाळी.
नंतर शेवट होईल, तेव्हा सर्व आधिपत्य, सर्व अधिकार व सामर्थ्य ही नष्ट केल्यावर तो देवपित्याला राज्य सोपवून देईल.
कारण आपल्या ‘पायांखाली सर्व शत्रू ठेवीपर्यंत’ त्याला राज्य केले पाहिजे.
जो शेवटला शत्रू नाहीसा केला जाईल तो मृत्यू होय.
कारण “त्याने सर्व अंकित करून त्याच्या पायांखाली ठेवले.” परंतु “सर्व अंकित केले आहे” असे जेव्हा म्हटले तेव्हा, ज्याने त्याला सर्व अंकित करून दिले त्याचा समावेश होत नाही हे उघड आहे.
त्याच्या अंकित सर्वकाही झाले असे जेव्हा होईल तेव्हा, ज्याने सर्व त्याच्या अंकित करून दिले त्याच्या अंकित स्वतः पुत्रही होईल; अशा हेतूने की, देव सर्वांना सर्वकाही व्हावा.1