बंधुजनहो, बालबुद्धीचे होऊ नका; पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजुतदारपणाबाबत प्रौढांसारखे व्हा. नियमशास्त्रात लिहिले आहे की, “परभाषा बोलणार्या लोकांच्या द्वारे व परक्या माणसांच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन; तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत,” असे प्रभूम्हणतो. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणार्यांसाठी नव्हेत, तर विश्वास न ठेवणार्यांसाठी चिन्हादाखल आहेत; संदेश हा विश्वास न ठेवणार्यांसाठी नव्हे, तर विश्वास ठेवणार्यांसाठी आहे. सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले, आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आत आले, तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खातरी होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो, त्याच्या अंत:करणातील गुप्त गोष्टी प्रकट होतात; आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करील व ‘तुमच्यामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे’ असे बोलून दाखवील. बंधुजनहो, तर मग काय? तुम्ही उपासनेकरता एकत्र जमता तेव्हा तुमच्यापैकी प्रत्येक जण, कोणी स्तोत्र गाण्यास, कोणी शिक्षण देण्यास, कोणी प्रकटीकरण सांगण्यास, कोणी भाषेतून बोलण्यास तर कोणी तिचा अर्थ सांगण्यास तयार असतो; सर्वकाही उन्नतीसाठी असावे. अन्य भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावेत; अधिक नसावेत व त्यांनी पाळीपाळीने बोलावे; आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वत:बरोबर व देवाबरोबर बोलावे; संदेश देणार्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे, आणि इतरांनी निर्णय करावा; तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रकट झाले, तर बोलणार्याने उगेच राहावे. सर्वांना शिक्षण मिळेल व सर्वांना बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल; संदेष्ट्यांचे आत्मे संदेष्ट्यांच्या स्वाधीन असतात. कारण देव अव्यवस्था माजवणारा नाही; तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळ्यांत जशी रीत आहे, तसे स्त्रियांनी मंडळ्यांत गप्प राहावे; कारण त्यांना बोलण्याची परवानगी नाही; नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी आपल्या मर्यादेत राहावे. त्यांना काही माहिती करून घेण्याची इच्छा असली तर त्यांनी आपल्या पतींना घरी विचारावे; कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे लज्जास्पद आहे. देवाच्या वचनाचा उगम तुमच्यापासून झाला काय? अथवा ते केवळ तुमच्याकडे आले काय? जर कोणी स्वत:ला संदेष्टा किंवा आत्म्याने संपन्न असे मानत असेल, तर जे मी तुम्हांला लिहिले ते प्रभूची आज्ञा आहे असे त्याने समजावे. कोणी तसे समजत नसल्यास न समजो. म्हणून बंधुजनहो, तुम्ही संदेश देण्याची उत्कंठा बाळगा, व निरनिराळ्या भाषा बोलण्यास मना करू नका. सर्वकाही शिस्तवार व व्यवस्थितपणे होऊ द्या.
१ करिंथ 14 वाचा
ऐका १ करिंथ 14
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 14:20-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ