YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ करिंथ 14:1-19

१ करिंथ 14:1-19 MARVBSI

प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या; तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हांला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. कारण अन्य भाषा1 बोलणारा माणसांबरोबर नव्हे, तर देवाबरोबर बोलतो; कारण ते माणसाला समजत नाही; तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्यांबाबत बोलतो. अन्य भाषा बोलणारा स्वत:चीच उन्नती करतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्यात, तरी विशेषत: तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे; कारण मंडळीच्या उन्नतीकरता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. तर आता बंधुजनहो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो पण प्रकटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्या द्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही, तर मी तुमचे काय हित साधणार? पावा, वीणा, असल्या नाद काढणार्‍या निर्जीव वस्तूंच्या भिन्नभिन्न नादांत भेद करून न दाखवल्यास पाव्याचा नाद कोणता, वीणेचा नाद कोणता, हे कसे समजेल? तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील, तर लढाईस जाण्याची तयारी कोण करील? त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाहीत तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वार्‍याबरोबर बोलणारे व्हाल. जगात भाषांचे बरेच प्रकार असतील, तरी एकही अर्थरहित नाही. म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही, तर बोलणार्‍याला मी बर्बर असा होईन आणि बोलणारा मला बर्बर असा होईल; तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही, मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावीत म्हणून खटपट करा. अन्य भाषा बोलणार्‍याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. तर मग काय? मी प्रार्थना आत्म्याच्या सामर्थ्याने करणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही करणार; मी स्तोत्र आत्म्याच्या सामर्थ्याने गाणार व बुद्धीच्या सामर्थ्यानेही गाणार. तू केवळ आत्म्याने धन्यवाद केलास, तर जो अशिक्षित लोकांपैकी आहे तो तुझ्या उपकारस्तुतीला “आमेन” कसे म्हणेल? कारण तू जे बोलतोस ते त्याला समजत नाही. कारण तुझे उपकारस्तुती करणे चांगले असेल, तरी त्याने2 दुसर्‍याची उन्नती होत नाही. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलावेत ह्यापेक्षा मी दुसर्‍यांना शिकवण्यासाठी पाच शब्द स्वतः समजूनउमजून बोलावेत हे मला आवडते.