करिंथ येथील देवाच्या मंडळीस, म्हणजे ख्रिस्त येशूमध्ये पवित्र केलेल्या व पवित्र जन होण्यास बोलावलेल्या लोकांना, आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त म्हणजे त्यांचा व आपलाही प्रभू, ह्याचे नाव सर्व ठिकाणी घेणार्या सर्वांना, देवाच्या इच्छेने ख्रिस्त येशूचा प्रेषित होण्याकरता बोलावलेला पौल व आपला बंधू सोस्थनेस ह्यांच्याकडून : देव आपला पिता व प्रभू येशू ख्रिस्त ह्यांच्यापासून तुम्हांला कृपा व शांती असो. ख्रिस्त येशूमध्ये तुमच्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहामुळे मी तुमच्याविषयी देवाची उपकारस्तुती सर्वदा करतो; तो अनुग्रह हा की, जसजशी ख्रिस्ताविषयीची साक्ष तुमच्यामध्ये दृढमूल झाली तसतसे तुम्ही त्याच्या ठायी प्रत्येक बाबतीत, सर्व बोलण्यात व सर्व ज्ञानात संपन्न झालात; असे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या प्रकट होण्याची वाट पाहणारे जे तुम्ही ते कोणत्याही कृपादानात उणे पडला नाहीत. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष ठरावे म्हणून तोच शेवटपर्यंत तुम्हांला दृढ राखील. ज्याने स्वपुत्र येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्या सहभागीपणात तुम्हांला बोलावले तो देव विश्वसनीय आहे. बंधुजनहो, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या नावाने मी तुम्हांला विनंती करतो की, तुम्हा सर्वांचे बोलणे सारखे असावे; म्हणजे तुमच्यामध्ये फुटी पडू नयेत; तुम्ही एकचित्ताने व एकमताने जोडलेले व्हावे. कारण माझ्या बंधूंनो, तुमच्यामध्ये कलह आहेत असे मला ख्लोवेच्या माणसांकडून कळले आहे. माझे म्हणणे असे आहे की, तुमच्यापैकी प्रत्येक जण “मी पौलाचा,” “मी अपुल्लोसाचा,” “मी केफाचा” आणि “मी ख्रिस्ताचा” आहे, असे म्हणतो. ख्रिस्ताचे असे विभाग झाले आहेत काय? पौलाला तुमच्यासाठी वधस्तंभावर खिळले होते काय? पौलाच्या नावात तुमचा बाप्तिस्मा झाला होता काय? क्रिस्प व गायस ह्यांच्याशिवाय तुमच्यापैकी कोणाचाही बाप्तिस्मा मी केला नाही, म्हणून मी देवाचे आभार मानतो. न जाणो, तुमचा बाप्तिस्मा पौलाच्या नावाने झाला असे कोणी म्हणायचा! (आणखी मी स्तेफनाच्या घरच्यांचाही बाप्तिस्मा केला; त्यांच्याखेरीज मी दुसर्या कोणाचा बाप्तिस्मा केला की नाही हे माझ्या लक्षात नाही.) कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करण्यास नव्हे तर सुवार्ता सांगण्यास पाठवले; पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्याने सांगण्यास पाठवले नाही.
१ करिंथ 1 वाचा
ऐका १ करिंथ 1
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ करिंथ 1:1-17
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ