YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 22

22
1मग दावीद म्हणाला, “परमेश्वर देवाचे मंदिर हेच आणि इस्राएलाचे होमबली अर्पण करण्याची वेदी हीच.” मंदिराच्या उभारणीची पूर्वतयारी 2इस्राएल देशात जे परदेशीय राहत होते त्यांना एकत्र करण्याची दाविदाने आज्ञा केली आणि देवाचे मंदिर बांधण्यासाठी चिरे घडून तयार करण्यास पाथरवट लावले;
3आणि दाविदाने दाराच्या कवाडांसाठी खिळे आणि सांध्यांसाठी पुष्कळ लोखंड, अपरिमित पितळ, 4व असंख्य गंधसरू जमा केले. सीदोन व सोर येथल्या लोकांनी गंधसरूची पुष्कळ लाकडे दाविदाला आणून दिली.
5दावीद म्हणाला, “माझा पुत्र शलमोन तरुण व सुकुमार आहे, आणि जे मंदिर परमेश्वराप्रीत्यर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य, सर्व देशांत विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे.” ह्या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली.
6मग त्याने आपला पुत्र शलमोन ह्याला बोलावून इस्राएलाचा देव परमेश्वर ह्याच्याप्रीत्यर्थ मंदिर बांधण्याची आज्ञा केली.
7दावीद आपला पुत्र शलमोन ह्याला म्हणाला, “माझा देव परमेश्वर ह्याच्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधावे असा माझा मानस होता खरा,
8पण परमेश्वराचा आदेश मला प्राप्त झाला की, ‘तू बहुत रक्तपात केला आहेस आणि पुष्कळ युद्धे केली आहेत; तुला माझ्या नामाने मंदिर बांधायचे नाही, कारण तू माझ्यादेखत पृथ्वीवर पुष्कळ रक्तपात केला आहेस.
9पाहा, तुला एक पुत्र होईल तो शांतताप्रिय मनुष्य असेल. मी त्याला त्याच्या चोहोकडल्या शत्रूंपासून विसावा देईन; त्याचे नाव शलमोन (शांतताप्रिय) असे होईल; त्याच्या कारकिर्दीत मी इस्राएलास शांती व स्वस्थता देईन.
10तो माझ्या नामाप्रीत्यर्थ मंदिर बांधील; तो माझा पुत्र व मी त्याचा पिता होईन; इस्राएलावरील त्याची गादी मी निरंतरची स्थापीन.’
11तर आता माझ्या पुत्रा, परमेश्वर तुझ्याबरोबर असो, तू कृतार्थ हो, आणि परमेश्वर तुझा देव तुझ्यासंबंधाने म्हणाला आहे त्याप्रमाणे त्याचे मंदिर बांध.
12तुझा देव परमेश्वर ह्याचे नियमशास्त्र तू पाळावेस म्हणून परमेश्वर तुला चातुर्य व विवेकबुद्धी देवो व इस्राएलावर तुझा अधिकार स्थापित करो.
13परमेश्वराने मोशेला इस्राएलासंबंधाने सांगितलेले नियम व निर्णय जर तू पाळशील तर तू कृतार्थ होशील; दृढ हो, हिंमत धर, भिऊ नकोस, कचरू नकोस.
14मी संकटात असताही परमेश्वराच्या मंदिराप्रीत्यर्थ एक लक्ष किक्कार सोने व दहा लक्ष किक्कार चांदी सिद्ध केली आहे; पितळ व लोखंड हे तर विपुल आहे, ते अपरिमित आहे; लाकूड व चिरे मी तयार केले आहेत, तुलाही त्यांत भर घालता येईल.
15शिवाय तुझ्याजवळ कामगार बहुत आहेत; पाथरवट व इमारती लाकडाचे काम करणारे आणि इतर सर्व प्रकारच्या कामात निपुण असे लोक आहेत.
16सोने, रुपे, पितळ व लोखंड हे अपरिमित आहे; तर आता उठून कामाला लाग, परमेश्वर तुझ्याबरोबर असो.”
17दाविदाने इस्राएलाच्या सर्व सरदारांना आज्ञा केली की, “माझा पुत्र शलमोन ह्याला साहाय्य करा.”
18तो म्हणाला, “तुमचा देव परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, नाही काय? त्याने तुम्हांला चोहोकडे शांतता दिली आहे ना? त्याने देशोदेशीचे लोक माझ्या हाती दिले आहेत आणि देश परमेश्वराच्या व त्याच्या लोकांच्या ताब्यात आला आहे.
19तर आता तुम्ही आपला देव परमेश्वर ह्याला जिवेभावे शरण जा. उठा, परमेश्वर देवाचे पवित्रस्थान बांधायला लागा; परमेश्वराच्या नामाप्रीत्यर्थ जे मंदिर बांधायचे आहे त्यात परमेश्वराच्या कराराचा कोश व देवाची पवित्र पात्रे ठेवायची आहेत.”

सध्या निवडलेले:

१ इतिहास 22: MARVBSI

ठळक

सामायिक करा

कॉपी करा

None

तुमचे हायलाइट तुमच्या सर्व डिव्हाइसेसवर सेव्ह करायचे आहेत? साइन अप किंवा साइन इन