YouVersion लोगो
सर्च आयकॉन

१ इतिहास 12:8-18

१ इतिहास 12:8-18 MARVBSI

दावीद अरण्यातील गढीत राहत असे तेव्हा गादी लोकांतले शूर वीर, युद्धकलेत प्रवीण, ढाल व बरची धारण करणारे, सिंहासारख्या मुखाचे आणि पहाडातील हरिणांच्या वेगाने धावणारे असे आपल्या वंशातून वेगळे होऊन दाविदाकडे आले ते हे : एजेर मुख्य, ओबद्या दुसरा, अलीयाब तिसरा, मिश्मन्ना चवथा, यिर्मया पाचवा, अत्तय सहावा, एलीएल सातवा, योहानान आठवा, एलजाबाद नववा, यिर्मया दहावा आणि मखबन्नय अकरावा. हे गादी सेनानायक होते; त्यांच्यातला कनिष्ठ शंभरांच्या तोडीचा होता व त्यांच्यातला श्रेष्ठ हजारांच्या तोडीचा होता. पहिल्या महिन्यात यार्देन नदी दुथडी भरून वाहते तेव्हा ह्यांनीच नदीपार जाऊन पूर्व व पश्‍चिम ह्या दोन दिशांकडल्या खोर्‍यांतील लोकांना पळवून लावले. बन्यामिनी व यहूदी लोकांपैकीही काही लोक दाविदाकडे गढीत गेले. दावीद त्यांना सामोरा जाऊन म्हणाला, “तुम्ही केवळ मित्रभावाने कुमक करण्यासाठी माझ्याकडे आला असल्यास माझे मन तुमच्याशी जडून राहील; पण तुम्ही माझ्याशी दगा करून मला शत्रूंच्या हाती देण्यासाठी आला असाल तर आपल्या पूर्वजांचा देव हे पाहून तुम्हांला शासन करो, कारण माझ्या हातून काही उपद्रव झालेला नाही.” मग त्या तिसांतला प्रमुख जो अमासय ह्याला आत्म्याने व्यापले व तो म्हणाला, “हे दाविदा, आम्ही आपलेच आहोत; इशायपुत्रा, आम्ही आपल्या पक्षाचे आहोत; आपले कुशल असो, कुशल असो; आपल्या साहाय्यकर्त्यांचेही कुशल असो; कारण आपला देव आपला साहाय्यकारी आहे.” ह्यावर दाविदाने त्यांना ठेवून घेतले व आपल्या सैन्यावर नायक नेमले.