परमेश्वराच्या वचनानुसार शौलाचे राज्य दाविदाच्या हाती द्यावे म्हणून जे लोक युद्ध करण्यासाठी हत्यारबंद होऊन हेब्रोन येथे त्याच्याकडे आले त्यांच्या प्रमुखांची गणती ही : यहूदी लोकांतले ढालबरची धारण करणारे, लढण्या-साठी हत्यारबंद झालेले लोक सहा हजार आठशे, शिमोनी वंशातले लढाईस सिद्ध झालेले शूर वीर सात हजार शंभर; लेव्यांतले चार हजार सहाशे इतके होते. अहरोन घराण्याचा नायक यहोयादा होता, त्याच्याबरोबर तीन हजार सातशे लोक होते. सादोक नावाचा एक तरुण महावीरही आला; त्याच्याबरोबर त्याच्या बापाच्या घराण्यातले बावीस सेनानायक आले. शौलाचे भाऊबंद बन्यामिनी ह्यांच्यापैकी तीन हजार आले; कारण हा वेळपावेतो बहुतेक बन्यामिनी लोक शौलाच्या घराण्यास धरून होते. एफ्राइमी लोकांतले महावीर जे आपापल्या पितृकुळांतील नामांकित पुरुष होते ते वीस हजार आठशे आले. मनश्शेच्या अर्ध्या वंशातले अठरा हजार लोक दाविदाला राजा करण्यास आले; त्यांची नावे नोंदण्यात आली. कालप्रवृत्ती ओळखून इस्राएलाने काय करावे हे ज्यांना कळत होते असे इस्साखार वंशातील दोनशे नायक आले; त्यांचे सर्व भाऊबंद त्यांच्या आज्ञेत होते. युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन सैन्याचा व्यूह रचून चालून जाणारे जबुलून वंशातले पन्नास हजार योद्धे आले; त्यांना व्यूहरचना चांगली करता येत असून त्यांचे मन दुटप्पी नसे. नफताली वंशातले सेनानायक एक हजार व त्यांच्याबरोबर ढाल व भाला धारण करणारे सदतीस हजार आले. सैन्याची व्यूहरचना करणारे दान वंशातले अठ्ठावीस हजार सहाशे योद्धे आले. सैन्याची व्यूहरचना करणारे व सैन्याबरोबर लढाईस जाणारे आशेर वंशातले चाळीस हजार योद्धे आले. यार्देनेच्या पूर्वेस राहणारे रऊबेनी, गादी व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांच्यातले एक लक्ष वीस हजार लोक युद्धाच्या सर्व प्रकारच्या हत्यारांनी सज्ज होऊन आले. हे सर्व व्यूहरचना करणारे योद्धे दाविदाला सर्व इस्राएलाचा राजा करावे म्हणून हेब्रोन येथे खर्या मनाने आले; दाविदाला राजा करावे म्हणून वरकड सर्व इस्राएल लोकही एकदिल झाले. ते तेथे तीन दिवस दाविदाबरोबर खातपीत राहिले, कारण त्यांच्या भाऊबंदांनी त्यांच्यासाठी सर्व सामग्री तयार केली होती. ह्याखेरीज त्यांच्या आसपास जे राहत होते म्हणजे इस्साखार, जबुलून व नफताली ह्या प्रांतांपर्यंत जे राहत होते त्यांनी भाकरीचे पीठ, अंजिरांच्या ढेपा, खिसमिसांचे घड, द्राक्षारस, तेल आदिकरून भोजनवस्तू, गाढवे, उंट, खेचरे व बैल ह्यांवर लादून आणल्या; त्याप्रमाणेच त्यांनी बैल व शेरडेमेंढरे पुष्कळ आणली, कारण इस्राएलात उत्सव चालला होता.
१ इतिहास 12 वाचा
ऐका १ इतिहास 12
सामायिक करा
सर्व आवृत्त्यांची तुलना करा: १ इतिहास 12:23-40
वचन सेव्ह करा, ऑफलाइन वाचा, शिकवण्याच्या क्लिप पहा आणि बरेच काही!
मुख्य
बायबल
योजना
व्हिडिओ