मग मी म्हणालो:
“हे महान व भयावह याहवेह, स्वर्गाच्या परमेश्वरा, जे तुमच्यावर प्रीती करतात व तुमच्या आज्ञा पाळतात, त्या सर्वांना तुम्ही प्रीतीने दिलेला करार पाळता, तुमचे कान माझ्या बोलण्याकडे लागो व तुमची दृष्टी तुमचा सेवक इस्राएली लोकांसाठी रात्रंदिवस करीत असलेल्या प्रार्थनेकडे वळो. आम्ही इस्राएली लोकांनी, मी व माझ्या पित्याच्या कुटुंबाने तुमच्याविरुद्ध घोर पाप केले आहे, हे मी कबूल करतो.