गाझा शहरावर फारोहने आक्रमण करण्यापूर्वी तेथील पलिष्टी लोकांविषयी याहवेहचे यिर्मयाह संदेष्ट्याला वचन आले ते असे:
याहवेह हे असे म्हणतात:
“पाहा, उत्तरेकडून जलस्तर उफाळून येत आहे;
तो प्रचंड प्रवाहात परिवर्तित होईल.
जो त्यांच्या भूमीला व तेथील सर्व गोष्टीला आच्छादित करेल
म्हणजे त्यात असणारी नगरे व तिथे राहणारे.
लोक किंकाळ्या मारतील;
त्या भूमीवरील सर्व रहिवासी विलाप करतील.
कारण त्यांच्या वेगाने धावणाऱ्या घोड्यांच्या टापांचा आवाज,
शत्रूंच्या रथाचा आवाज
आणि त्यांच्या चाकांचा खडखडाट ऐकू येत आहे.
त्यांचे पालक वळून त्यांच्या मुलांना मदत करू शकणार नाहीत;
त्यांचे हात गळून गेल्यागत झाले आहेत.