उत्प. 2

2
1त्यानंतर पृथ्वी, आकाश आणि त्यातील सर्वकाही पूर्ण करून झाले, आणि सर्वकाही जिवंत जिवांनी भरून गेले#अशाप्रकारे सर्व बाबींची उत्पत्ती झाली. 2देवाने सातव्या दिवशी आपण करीत असलेले काम समाप्त केले, आणि जे त्याने केले होते त्या त्याच्या कामापासून त्याने सातव्या दिवशी विसावा घेतला. 3देवाने सातव्या दिवसास आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला, कारण देवाने त्याचे निर्मितीचे जे सर्व काम केले होते त्या आपल्या कामापासून त्या दिवशी त्याने विसावा घेतला.
4परमेश्वर देवाने ज्या दिवशी ते निर्माण केले, तेव्हाचा आकाश व पृथ्वीसंबंधीच्या घटनाक्रमाविषयीचा वृत्तान्त हा आहे. 5शेतातील कोणतेही झुडूप अजून पृथ्वीवर नव्हते, आणि शेतातील कोणतीही वनस्पती अजून उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अद्याप पृथ्वीवर पाऊस पाडला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. 6पण पृथ्वीवरुन धुके#प्रवाह वर जात असे व त्याने सर्व जमिनीचा पृष्ठभाग पाण्याने भिजवला जात असे.
7परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जिवंत प्राणी झाला.
एदेन बाग
8परमेश्वर देवाने पूर्वेकडे एदेनात एक बाग लावली आणि त्या बागेत आपण घडविलेल्या मनुष्यास ठेवले. 9परमेश्वर देवाने दिसण्यास सुंदर आणि खाण्यास चांगले फळ देणारे प्रत्येक झाड जमिनीतून उगवले. त्यामध्ये बागेच्या मध्यभागी असलेले जीवनाचे झाड, आणि बऱ्यावाईटाचे ज्ञान देणारे झाड यांचाही समावेश होता. 10बागेला पाणी देण्यासाठी एदेनातून एक नदी निघाली. तेथून ती विभागली आणि तिच्या चार नद्या झाल्या.
11पहिल्या नदीचे नाव पीशोन. ही संपूर्ण हवीला देशामधून वाहते, तेथे सोने सापडते. 12त्या देशाचे सोने चांगल्या प्रतीचे असून तेथे मोती व गोमेद रत्नेसुद्धा सापडतात.
13दुसऱ्या नदीचे नाव गीहोन आहे. ही सगळ्या कूश #इथोपियादेशामधून वाहते. 14तिसऱ्या नदीचे नाव टायग्रीस. ही अश्शूर देशाच्या पूर्वेस वाहत जाते. चौथ्या नदीचे नाव फरात असे आहे.
15परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत तिची मशागत करण्यासाठी व बागेची काळजी घेण्यासाठी ठेवले. 16परमेश्वर देवाने मनुष्यास आज्ञा दिली; तो म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खात जा; 17परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ तू खाऊ नये, कारण तू ज्या दिवशी त्या झाडाचे फळ खाशील त्याच दिवशी तू नक्कीच मरशील.”
18नंतर परमेश्वर देव बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी सुसंगत मदतनीस निर्माण करीन.” 19परमेश्वर देवाने मातीमधून जमिनीवरील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्व जातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने त्या सर्वांना नावे दिली. 20आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्व पक्षी आणि सर्व वनपशू यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू-पक्षी पाहिले परंतु त्यांमध्ये त्यास सुसंगत असा मदतनीस सापडला नाही.
21तेव्हा परमेश्वर देवाने मनुष्यास गाढ झोप लागू दिली, आणि तो झोपला असता परमेश्वराने मनुष्याच्या शरीरातून एक बरगडी काढली व ती जागा मांसाने बंद केली. 22परमेश्वर देवाने मनुष्याची बरगडी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला मनुष्याकडे आणले. 23तेव्हा मनुष्य म्हणाला,
“आता ही मात्र माझ्या हाडातले हाड व माझ्या मांसातले मांस आहे;
मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो,
कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
24म्हणून मनुष्य आपल्या आई वडीलांस सोडून आपल्या पत्नीला जडून राहील आणि ती दोघे एक देह होतील. 25तेथे मनुष्य व त्याची पत्नी ही दोघेही नग्न होती, परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.

נבחרו כעת:

उत्प. 2: IRVMar

הדגשה

שתף

העתק

None

רוצים לשמור את ההדגשות שלכם בכל המכשירים שלכם? הירשמו או היכנסו