लूक 15

15
हरवलेले मेंढरू
मत्त. 18:10-14
1सर्व जकातदार व पापी त्याचे ऐकण्यास त्याच्याजवळ येत होते. 2तेव्हा परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक कुरकुर करू लागले. ते म्हणू लागले, “हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो!”
3मग येशूने त्यांनाही दाखला सांगितला. 4“तुमच्यापैकी कोणा एकाजवळ शंभर मेंढरे असून त्यातील एक हरवले, तर तो नव्याण्णव रानात सोडून हरवलेल्या मेंढरामागे ते सापडेपर्यंत जाणार नाही काय? 5आणि जेव्हा त्यास ते सापडते तेव्हा तो आनंदाने ते खांद्यांवर घेतो. 6आणि घरी येतो, तेव्हा मित्रांना आणि शेजाऱ्यांना एकत्र करून म्हणतो, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले मेंढरू सापडले आहे. 7त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.
हरवलेले नाणे
8 किंवा एका स्त्रीकडे चांदीची दहा नाणी आहेत आणि जर तिचे एक नाणे हरवले तर ती दिवा लावून घर झाडून ते मिळेपर्यंत काळजीपूर्वक शोधणार नाही काय? 9आणि तिला जेव्हा ते नाणे सापडते तेव्हा ती मैत्रिणींना आणि शेजाऱ्याना बोलाविते आणि म्हणते, माझ्याबरोबर आनंद करा कारण माझे हरवलेले नाणे सापडले आहे. 10त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.”
उधळ्या मुलगा व त्याचा वडील भाऊ
11मग येशू म्हणाला, “एका मनुष्यास दोन पुत्र होते. 12त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. 13त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. 14त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. 15त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. 16तेव्हा कोणी त्यास काहीही #खावयास न दिल्याने न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. 17नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! 18आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. 19तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या. 20मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. 21मुलगा त्यास म्हणाला, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार #मुलगा म्हणवून घेण्यास मी योग्य नाही नाही. 22परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. 23आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! 24कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले. 25यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. 26त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? 27तो नोकर त्यास म्हणाला, तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे. 28तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला. 29परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा #खाण्यासाठी दिले नाही. 30आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. 31तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. 32परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.”

Valgt i Øjeblikket:

लूक 15: IRVMar

Markering

Del

Kopiér

None

Vil du have dine markeringer gemt på tværs af alle dine enheder? Tilmeld dig eller log ind