Logo YouVersion
Eicon Chwilio

लूक 21

21
विधवेचे दोन पैसे
मार्क 12:41-44
1येशूने दृष्टी वर करून श्रीमंत लोकांस दानपेटीत दान टाकतांना पाहीले. 2त्याने एका गरीब विधवेलाही तांब्याची दोन नाणी म्हणजे एक दमडी टाकताना पाहिले. 3तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. 4कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
यरूशलेम शहराचा विध्वंस व युगाची समाप्ती याविषयी येशूचे भविष्य
मत्त. 24:1, 2; मार्क 13:1, 2
5शिष्यातील काहीजण परमेश्वराच्या भवनाविषयी असे बोलत होते की, “ते सुंदर दगडांनी आणि अर्पणांनी सुशोभित केले आहे.” येशू म्हणाला, 6“असे दिवस येतील की, हे जे तुम्ही पाहता त्यांतून जो पाडून टाकला जाणार नाही असा दगडावर दगड येथे राहणार नाही.” 7त्यांनी त्यास प्रश्न विचारला, “गुरुजी या गोष्टी केव्हा घडतील? व या गोष्टी घडणार आहेत यासंबंधी कोणते चिन्ह असेल?” 8येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’ 9जेव्हा तुम्ही लढाया व दंगे याविषयी ऐकाल तेव्हा घाबरु नका कारण या गोष्टी घडल्याच पाहिजेत. पण एवढ्यात शेवट होणार नाही.” 10मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. 11मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील. 12परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. 13यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. 14तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा, 15कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही. 16परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील. 17माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा द्वेष करतील. 18परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. 19तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
20 तुम्ही जेव्हा यरूशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. 21जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. 22ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. 23त्या दिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल. 24ते तलवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरूशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
25 सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. 26भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील. 27नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील. 28परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
जागृतीची आवश्यकता
मत्त. 24:32-35; मार्क 13:28-31
29नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, “अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा. 30त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. 31त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. 32मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. 33आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
34 परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. 35खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल. 36यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.”
37प्रत्येक दिवशी तो परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असे आणि रात्री मात्र तो जैतूनाचा डोंगर म्हटलेल्या टेकडीवर राहत असे. 38सर्व लोक भवनात जाण्यासाठी व त्याचे ऐकण्यासाठी पहाटेस उठून त्याच्याकडे येत असत.

Dewis Presennol:

लूक 21: IRVMar

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda