Logo YouVersion
Eicon Chwilio

योहा. 5

5
बेथसैदा तळ्याजवळचा पंगू मनुष्य
1त्यानंतर यहूद्यांचा सण होता आणि येशू यरूशलेम शहरास वर गेला. 2यरूशलेम शहरास, मेंढरे दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. 3त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. 4कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. 5तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. 6येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” 7त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” 8येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.”
9लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला.
तो दिवस शब्बाथ दिवस होता.
10यावरुन यहूदी त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास म्हणाले, “आज शब्बाथ आहे, बाज उचलणे तुला योग्य नाही.” 11त्याने त्यांना उत्तर दिले, “ज्याने मला बरे केले त्यानेच मला सांगितले की, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” 12त्यांनी त्यास विचारले, “आपली बाज उचलून चाल, असे ज्याने तुला म्हणले तो मनुष्य कोण आहे?” 13पण तो कोण होता हे त्या बऱ्या झालेल्या मनुष्यास माहित नव्हते; कारण त्याठिकाणी लोकसमुदाय असल्यामुळे येशू निसटून गेला होता. 14त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.” 15त्या मनुष्याने जाऊन यहूद्यांना सांगितले, “ज्याने मला बरे केले तो येशू आहे.” 16या कारणावरून यहूदी येशूच्या पाठीस लागले, कारण तो शब्बाथ दिवशी अशी कामे करत असे. 17येशूने त्यांना उत्तर दिले, “माझा स्वर्गीय पिता आजपर्यंत काम करीत आहे आणि मीही काम करीत आहे.” 18यामुळे तर यहूदी त्यास जीवे मारण्याची अधिकच खटपट करू लागले, कारण त्याने शब्बाथ मोडला एवढेच नाही, पण देवाला स्वतःचा पिता म्हणून त्याने स्वतःला देवासमान केले होते.
19यावरुन येशूने त्यांना उत्तर दिले; “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुत्र पित्याला जे काही करताना पाहतो त्यावाचून काहीही त्यास स्वतः होऊन करता येत नाही; कारण तो जे काही करतो ते पुत्रही तसेच करतो. 20कारण पिता पुत्रावर प्रीती करतो आणि तो स्वतः जे काही करतो ते त्यास दाखवतो आणि तुम्ही आश्चर्य करावे म्हणून तो याहून मोठी कामे त्यास दाखवील. 21कारण पिता जसा मरण पावलेल्यांना उठवून जिवंत करतो तसा पुत्रही पाहिजे त्यांना जिवंत करतो. 22पिता कोणाचा न्याय करीत नाही, तर न्याय करण्याचे सर्व काम त्याने पुत्राकडे सोपवून दिले आहे. 23यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही. 24मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.
25 मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. 26कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. 27आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. 28त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, 29आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.
30 मला स्वतः होऊन काही करता येत नाही. जसे मी ऐकतो तसा न्यायनिवाडा करतो आणि माझा निवाडा योग्य आहे कारण मी स्वतःच्या इच्छेप्रमाणे नाही तर ज्याने मला पाठवले त्याच्या इच्छेप्रमाणे करायला पाहतो. 31मी जर स्वतःविषयी साक्ष दिली तर माझी साक्ष खरी नाही; 32माझ्याविषयी साक्ष देणारा दुसरा आहे; आणि मला माहीत आहे की, माझ्याविषयी तो साक्ष देतो ती साक्ष खरी आहे. 33तुम्ही योहानाकडे पाठवून विचारले व त्याने सत्याविषयी साक्ष दिली. 34पण मी मनुष्याची साक्ष मान्य करीत नाही, तथापि तुम्हास तारण प्राप्त व्हावे म्हणून मी हे सांगतो. 35तो जळता व प्रकाशणारा दिवा होता; आणि तुम्ही काही काळ त्याच्या प्रकाशात आनंद करण्यास मान्य झालात. 36परंतु माझ्याजवळ जी साक्ष आहे ती योहानाच्या साक्षीपेक्षा मोठी आहे, कारण जी कार्ये सिद्धीस नेण्याचे पित्याने माझ्याकडे सोपवले आहे, म्हणजे जी कार्ये मी करतो तीच माझ्याविषयी साक्ष देतात की, पित्याने मला पाठवले आहे. 37आणखी ज्या पित्याने मला पाठवले आहे त्यानेच माझ्याविषयी साक्ष दिली आहे. तुम्ही कधीही त्याची वाणी ऐकली नाही व त्याचे स्वरूपही पाहिलेले नाही. 38त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही? 39तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत. 40पण तुम्ही आपल्याला जीवन मिळावे म्हणून माझ्याकडे येऊ इच्छीत नाही. 41मी मनुष्याकडून प्रशंसा करून घेत नाही. 42परंतु मी तुम्हास ओळखले आहे की, तुमच्यात देवाविषयी प्रीती नाही. 43मी आपल्या स्वर्गीय पित्याच्या नावाने आलो आहे पण तुम्ही माझा स्वीकार करत नाही; दुसरा कोणी स्वतःच्या नावाने आला तर तुम्ही त्याचा स्वीकार कराल. 44जे तुम्ही एकमेकांकडून प्रशंसा करून घेता आणि जो एकच देव आहे त्याच्याकडून प्रशंसा करून घेण्याची खटपट करत नाही, त्या तुम्हास विश्वास ठेवता येणे कसे शक्य आहे? 45मी पित्यासमोर तुमच्यावर आरोप करीन, असे मानू नका. तुम्ही ज्याच्यावर आशा ठेवता तो मोशेच तुमच्यावर आरोप लावणार आहे; 46कारण तुम्ही मोशेवर विश्वास ठेवला असता तर माझ्यावर विश्वास ठेवला असता, कारण त्याने माझ्याविषयी लिहिले आहे. 47पण तुम्ही त्याच्या लिखाणावर विश्वास ठेवत नाही, तर माझ्या वचनांवर कसा विश्वास ठेवाल?”

Dewis Presennol:

योहा. 5: IRVMar

Uwcholeuo

Rhanna

Copi

None

Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda