योहा. 1
1
अनंतकालीक शब्द
उत्प. 1:1-2:3
1प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. 2तोच प्रारंभी देवासह होता. 3सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही. 4त्याच्यामध्ये जीवन होते; आणि ते जीवन मनुष्यमात्राचा प्रकाश होते. 5तो प्रकाश अंधारात प्रकाशतो; तरी अंधाराने त्यास स्वीकारले नाही.
6देवाकडून पाठविलेला एक मनुष्य प्रकट झाला; त्याचे नाव योहान. 7तो साक्षीकरीता, त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला; यासाठी की सर्वांनी त्याच्याद्वारे विश्वास ठेवावा. 8योहान तो प्रकाश नव्हता, पण त्या प्रकाशाविषयी साक्ष द्यावी म्हणून आला.
9जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्यास प्रकाशित करतो तो जगात येणार होता. 10तो जगात होता व जग त्याच्याद्वारे निर्माण झाले, तरी जगाने त्यास ओळखले नाही. 11जे त्याचे स्वतःचे त्यांच्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. 12पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. 13त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
14शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते. 15योहान त्याच्याविषयी साक्ष देतो आणि मोठ्याने म्हणतो, “ज्याच्याविषयी मी सांगितले की, माझ्यामागून जो येत आहे तो माझ्यासमोर झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता, तो हाच आहे.” 16त्याच्या पूर्णतेतून आपल्या सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे. 17कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली. 18देवाला कोणीही कधीहि पाहिले नाही. जो देवाचा एकुलता एक पुत्र पित्याच्या उराशी असतो त्याने त्यास प्रकट केले आहे.
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने येशूविषयी दिलेली साक्ष
मत्त. 3:1-12; मार्क 1:1-8; लूक 3:1-20
19आणि योहानाची साक्ष ही आहे; जेव्हा यहूदी अधिकाऱ्यांनी यरूशलेम शहराहून याजक व लेवी यांना त्यास विचारायला पाठवले की, “तू कोण आहे?” 20त्याने उघडपणे कबूल केले, नाकारले नाही, “मी ख्रिस्त नाही,” असे त्याने कबूल केले. 21तेव्हा त्यांनी त्यास विचारले, “तर मग आपण कोण आहात? एलीया आहात का?” तो म्हणाला, “मी नाही.” “आपण तो संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “मी नाही.” 22यावरुन ते त्यास म्हणाले, “आपण कोण आहा? म्हणजे ज्यांनी आम्हास पाठवले त्यांना आम्ही उत्तर देऊ. स्वतःविषयी आपले काय म्हणणे आहे?” 23तो म्हणाला, “यशया संदेष्ट्याने सांगितल्याप्रमाणे
‘परमेश्वराचा मार्ग नीट करा ज्याच्या वाट सरळ करा,
असे अरण्यात ओरडणाऱ्याची वाणी’ मी आहे.”
24आणि पाठविलेली माणसे परूश्यांपैकी होती. 25आणि त्यांनी त्यास प्रश्न करून म्हटले, “आपण जर ख्रिस्त नाही किंवा एलीया नाही किंवा तो संदेष्टाही नाही, तर आपण बाप्तिस्मा का करता?” 26योहानाने त्यांना उत्तर दिले, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, पण तुम्ही ज्याला ओळखित नाही असा एकजण तुम्हामध्ये उभा आहे. 27तो माझ्यामागून येणारा आहे, त्याच्या वहाणांचा बंद सोडावयास मी योग्य नाही.” 28यार्देनेच्या पलीकडील बेथानीत योहान बाप्तिस्मा करीत होता तेथे या गोष्टी घडल्या.
29दुसर्या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा! 30ज्याच्याविषयी मी म्हणालो होतो की, ‘माझ्यामागून एकजण येत आहे तो माझ्या पुढचा झाला आहे कारण तो माझ्या पूर्वी होता,’ तो हाच आहे. 31मी त्यास ओळखत नव्हतो; तरी त्याने इस्राएलात प्रकट व्हावे म्हणून मी पाण्याने बाप्तिस्मा करीत आलो आहे.” 32योहानाने अशी साक्ष दिली की, “आत्मा कबुतरासारखा आकाशातून उतरत असतांना आणि त्याच्यावर स्थिर राहिलेला मी पाहिला. 33मी तर त्यास ओळखत नव्हतो, तरी मी पाण्याने बाप्तिस्मा करावा म्हणून ज्याने मला पाठवले त्याने मला सांगितले की, ‘तू ज्या कोणावर आत्मा उतरत असतांना आणि स्थिर राहिलेला पाहशील तोच पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा करणारा आहे.’ 34मी स्वतः पाहिले आहे आणि साक्ष दिली आहे की, हा देवाचा पुत्र आहे.”
बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शिष्य व येशू
35त्यानंतर दुसर्या दिवशी योहान व त्याच्या शिष्यांतील दोघांसह उभा असता; 36येशूला जातांना न्याहाळून पाहून म्हणाला, “हा पाहा, देवाचा कोकरा!” 37त्याचे हे म्हणणे त्या दोघा शिष्यांनी ऐकले आणि ते येशूच्या मागोमाग निघाले. 38तेव्हा येशू वळून त्यांना आपल्यामागे येताना पाहून म्हणाला, “तुम्ही काय शोधीता?” ते त्यास म्हणाले, “रब्बी, (म्हणजे गुरूजी) आपण कोठे राहता?” 39तो त्यांना म्हणाला, “या म्हणजे पाहाल.” मग त्यांनी जाऊन तो कोठे राहतो ते बघितले आणि ते त्यादिवशी त्याच्या येथे राहिले; तेव्हा तो सुमारे चार वाजले होते. 40योहानाचे बोलणे ऐकून त्याच्यामागे जे दोघे जण गेले, त्यांच्यापैकी एक शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया हा होता. 41त्यास त्याचा सख्खा भाऊ शिमोन पहिल्याने भेटला व त्यास म्हणाला, “आम्हास मसीहा (म्हणजे ख्रिस्त) सापडला आहे.” 42त्याने त्यास येशूकडे आणले; येशूने त्याच्याकडे न्याहाळून पाहून म्हटले, “तू योहानाचा पुत्र शिमोन आहेस. तुला केफा (म्हणजे पेत्र किंवा खडक) म्हणतील.” 43दुसर्या दिवशी त्याने गालील प्रांतात जाण्याचा बेत केला; आणि तेव्हा फिलिप्प त्यास भेटला; येशूने त्यास म्हटले, “माझ्यामागे ये.” 44आता, फिलिप्प बेथसैदाचा, म्हणजे अंद्रिया व पेत्र यांच्या नगराचा होता. 45फिलिप्पाला नथनेल भेटल्यावर तो त्यास म्हणाला, “ज्याच्याविषयी मोशेने नियमशास्त्रात लिहिले व तसेच संदेष्ट्यांनी लिहिले, तो म्हणजे योसेफाचा पुत्र येशू नासरेथकर आम्हास सापडला आहे.” 46नथनेल त्यास म्हणाला, “नासरेथमधून काहीतरी उत्तम निघू शकेल काय?” फिलीप्पाने त्यास म्हणाला, “येऊन पाहा.” 47नथनेल आपल्याकडे येत आहे हे येशूने बघितले व तो म्हणाला, “पाहा, हा खरा इस्राएली आहे, याच्यात कपट नाही.” 48नथनेल त्यास म्हणाला, “आपणांला माझी ओळख कोठली?” येशूने त्यास उत्तर दिले, “तुला फिल्लीपाने बोलावले त्यापुर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला बघितले.” 49नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.” 50येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, “मी तुला अंजिराच्या झाडाखाली पाहिले असे तुला सांगितले म्हणून तू विश्वास ठेवतोस काय? तू याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी पाहशील.” 51आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.”
Dewis Presennol:
योहा. 1: IRVMar
Uwcholeuo
Rhanna
Copi
Eisiau i'th uchafbwyntiau gael eu cadw ar draws dy holl ddyfeisiau? Cofrestra neu mewngofnoda
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.