YouVersion Logo
Search Icon

रोम. 3

3
आक्षेपांचे खंडन
1मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ? 2सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती.
3पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय? 4कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस,
आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
5पण आमची अनीती जर देवाचे न्यायीपण स्थापित करते तर आम्ही काय म्हणावे? जो देव आमच्यावर आपला क्रोध आणतो तो अन्यायी आहे काय? (मी मानवी व्यवहाराप्रमाणे बोलत आहे.) 6कधीच नाही! असे झाले तर, देव जगाचा न्याय कसा करील? 7कारण जर माझ्या लबाडीने देवाचा खरेपणा अधिक प्रकट होऊन त्याच्या गौरवास कारण झाले, तर माझाही पापी म्हणून न्याय का व्हावा? 8आणि आपण चांगले घडावे म्हणून वाईट करू या असे का म्हणून नये? आम्ही असे सांगत असतो अशी आमची निंदा कित्येक लोक करत आहे, अशा लोकांची त्यांना यथान्याय शिक्षा आहे.
मनुष्यप्राणी पापी आहे; नीतिमान कोणीही नाही.
स्तोत्र. 14:1-3; 53:1-4
9मग काय? आपण यहूदी अधिक चांगले आहोत काय? मुळीच नाही, कारण सगळे यहूदी व ग्रीक पापाखाली आहेत, असा आधीच आम्ही त्यांच्यावर आरोप केला आहे. 10पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही.
11ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
12ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत;
सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही.
13त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे.
ते आपल्या जीभांनी कपट योजतात,
त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
14त्यांचे तोंड शापाने व कडूपणाने भरले आहे;
15त्यांचे पाय रक्त पाडण्यास उतावळे आहेत.
16विध्वंस व विपत्ती त्यांच्या मार्गात आहेत.
17शांतीचा मार्ग त्यांनी ओळखला नाही.
18त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’
19आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे. 20कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.
ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे नीतीमत्वाची प्राप्ती
21पण नियमशास्त्राकडून व संदेष्ट्यांकडून साक्ष दिली गेल्याप्रमाणे, नियमशास्त्राशिवाय देवाचे नीतिमत्त्व, आता, प्रकट झाले आहे. 22पण हे देवाचे नीतिमत्त्व येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, विश्वास ठेवणार्‍या सर्वांसाठी आहे कारण तेथे कसलाही फरक नाही. 23कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत; 24देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात. 25त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे; 26त्याने या आताच्या काळात आपले नीतिमत्त्व प्रकट करावे, म्हणजे त्याने नीतिमान असावे आणि जो येशूवर विश्वास ठेवतो त्यास नीतिमान ठरविणारा व्हावे. 27मग आपला अभिमान कुठे आहे? तो बाहेर ठेवला गेला. कोणत्या नियमामुळे? कर्मांच्या काय? नाही, पण विश्वासाच्या नियमामुळे. 28म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो. 29किंवा देव केवळ यहूद्यांचा देव आहे काय? परराष्ट्रीयाचा नाही काय? हो, परराष्ट्रीयांचा ही आहे. 30जर सुंता झालेल्यांस विश्वासाने आणि सुंता न झालेल्यांस विश्वासाद्वारे जो नीतिमान ठरवील तो तोच एक देव आहे.
31तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.

Currently Selected:

रोम. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in