YouVersion Logo
Search Icon

रोम. 11

11
देवाने इस्राएली लोकांचा सर्वस्वी त्याग केला नाही
1तर मी म्हणतो की, देवाने आपल्या लोकांस नाकारले आहे काय? कधीच नाही कारण मीही इस्राएली आहे, अब्राहामाच्या संतानातला, बन्यामिनाच्या वंशातला आहे. 2देवाला पूर्वीपासून माहीत असलेल्या त्याच्या प्रजेला त्याने नाकारले नाही. शास्त्रलेख एलीयाविषयी काय म्हणतो हे तुम्ही जाणत नाही काय? तो देवाजवळ इस्राएलाविरुद्ध अशी विनंती करतो की, 3‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’ 4पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ 5मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे. 6आणि जर कृपेने आहे, तर कृतीवरून नाही; तसे असेल तर कृपा ही कृपा होत नाही. 7मग काय? इस्राएल जे मिळवू पाहत आहे ते त्यास मिळाले नाही, पण निवडलेल्यांना ते मिळाले आणि बाकी अंधळे केले गेले. 8कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
9त्याचप्रमाणे दावीद म्हणतो की,
‘त्यांचे मेज हे त्यांच्यासाठी जाळे व सापळा,
आणि अडथळा व प्रतिफळ होवो.
10त्यांनी पाहू नये म्हणून त्यांचे डोळे अंधकारमय होवोत,
आणि तू त्यांची पाठ सतत वाकव.’
11मग मी विचारतो की, इस्राएलाने पडावे म्हणून त्यांना अडखळण आहे काय? तसे न होवो. पण त्यांच्या पडण्यामुळे त्यांना ईर्ष्येस चढवण्यास तारण परराष्ट्रीयांकडे आले आहे. 12आता, त्यांचा अपराध हे जर जगाचे धन झाले आणि त्यांचे कमी होणे हे जर परराष्ट्रीयांची धन झाले, तर त्यांचा भरणा होणे हे त्याहून किती अधिक होईल?
परराष्ट्रीयांचे तारण; कलम लावण्याचे उदाहरण
13पण, तुम्ही जे परराष्ट्रीय आहात, त्या तुमच्याशी मी बोलत आहे. ज्याअर्थी, मी परराष्ट्रीयांचा प्रेषित आहे त्याअर्थी, मी माझ्या सेवेचे गौरव करतो. 14यहूदी म्हणजे माझ्या देहाचे आहेत त्यांना मी शक्य त्याद्वारे ईर्ष्येस चढवून त्यांच्यामधील काहींचे तारण करावे. 15कारण त्यांचा त्याग म्हणजे जगाशी समेट आहे तर त्यांचा स्वीकार म्हणजे मृतांतून जीवन नाही काय? 16कारण पहिला उंडा जर पवित्र आहे तर तसाच सगळा गोळा आहे आणि मूळ जर पवित्र आहे तर तसेच फाटे आहेत. 17आणि जैतुनाचे काही फाटे जर तोडले गेले आणि तू रानटी जैतून असता, त्यामध्ये कलम करून जोडला गेलास आणि तू त्या जैतुनाच्या पौष्टीकतेच्या मुळात जर सहभागी झालास 18तर त्या फाट्यांविरुद्ध अभिमान मिरवू नकोस आणि जरी अभिमान मिरवलास तरी तू मुळाला उचलले नसून मुळाने तुला उचलले आहे. 19मग तू म्हणशील की, मला कलम करून जोडण्यासाठी ते फाटे तोडले गेले. 20बरे, ते अविश्वासामुळे तोडले गेले आणि तू विश्वासामुळे स्थिर आहेस, ह्यात मोठेपणा मानू नकोस. पण भीती बाळग; 21कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही. 22तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाही तर, तूही छाटला जाशील. 23आणि ते जर अविश्वासात राहिले नाहीत तर तेही कलम करून जोडले जातील; कारण देव त्यांना पुन्हा कलम करून जोडण्यास समर्थ आहे. 24कारण तुला मूळच्या रानटी जैतुनांतून कापून, जर निसर्गाविरुद्ध, चांगल्या जैतुनाला कलम करून जोडले आहे, तर जे नैसर्गिक फाटे आहेत ते, किती विशेषेकरून, आपल्या मूळच्या जैतुनाला कलम करून जोडले जातील?
सर्वांवर ममता करणे हाच देवाचा अंतिम हेतू
25बंधूंनो, तुम्ही स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नये, म्हणून माझी इच्छा नाही की, तुम्ही या रहस्याविषयी अज्ञानी असावे. ते असे की, परजनांचा भरणा आत येईपर्यंत इस्राएलात काही अंशी अंधळेपण उद्धवले आहे.
26आणि सर्व इस्राएल अशाप्रकारे तारले जाईल कारण पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की,
‘सियोनापासून उद्धारक येईल,
आणि याकोबातून अभक्ती घालवील.
27आणि मी त्यांची पापे दूर करीन.
तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’
28ते सुवार्तेच्या बाबतीत तुमच्यामुळे वैरी आहेत पण ते दैवी निवडीच्या बाबतीत पूर्वजांमुळे प्रिय आहेत. 29कारण देवाची कृपादाने व पाचारण अपरिवर्तनीय असतात. 30कारण ज्याप्रमाणे पूर्वी तुम्ही देवाचा अवमान करीत होता पण आता इस्त्राएलाच्या आज्ञाभंगामुळे तुमच्यावर दया केली गेली आहे. 31त्याचप्रमाणे आता तेही अवमान करीत आहेत; म्हणजे तुमच्यावरील दयेच्या द्वारे त्यांच्यावर दया केली जावी. 32कारण देवाने सर्वांवर दया करावी म्हणून सर्वांना आज्ञाभंगात एकत्र कोंडले आहे.
33अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत?
34असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे?
किंवा त्याचा सल्लागार कोण होता?
35किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’
36कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.

Currently Selected:

रोम. 11: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in