लूक 11
11
प्रभुची प्रार्थना
मत्त. 6:9-15
1मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती संपल्यावर शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “प्रभू, जसे योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले; त्याचप्रमाणे तुम्ही देखील आम्हास प्रार्थना करायला शिकवा.”
2मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः
हे आमच्या स्वर्गातील पित्या,
तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,
3 आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे,
4 आमच्या पापांची आम्हास क्षमा कर,
कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला
त्यांच्या अपराधांची क्षमा करतो
आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस
तर आम्हास वाईटापासून सोडव.”
आग्रहाची प्रार्थना व मध्यरात्री आलेल्या मित्राचा दृष्टांत
5मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, 6कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ 7आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’ 8मी तुम्हास सांगतो की, जरी तो उठून त्यास काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्यास जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्यास देईल. 9आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. 10कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. 11तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? 12किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल? 13जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
सैतानाच्या साहाय्याने येशू आपली कामे करतो या आरोपाला त्याने दिलेले उत्तर
मत्त. 12:22-30; मार्क 3:22-27
14येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर, तो बोलू लागला व लोकांचा जमाव आश्चर्यचकित झाला. 15परंतु त्या जमावातील काही लोक म्हणाले की, भूतांचा अधिपती जो बालजबूल #सैतान याच्या साहाय्याने तो भूते काढतो. 16आणि काहींनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी स्वर्गातून चिन्ह मागितले. 17पण त्यांच्या मनात काय होते हे तो जाणून होता म्हणून तो त्यांना म्हणाला, “आपसात फूट पडलेले प्रत्येक राज्य ओसाड पडते आणि एखाद्या घरातील लोक एकमेकांविरुद्ध भांडतात तेव्हा त्या घराचे तुकडे होतात. 18आणि तुम्ही म्हणता तशी जर भूतांमध्येही फूट पडली तर त्याचे राज्य कसे टिकेल? मी तुम्हास हे विचारतो, कारण तुम्ही म्हणता ‘मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो’ 19पण जर मी बालजबूलच्या साहाय्याने भूते काढतो, तर तुमचे शिष्य कोणाच्या साहाय्याने भूते काढतात? म्हणून तेच तुमचा न्याय करतील. 20परंतु जर मी देवाच्या साहाय्याने भूते काढतो, तर मग यावरुन हे स्पष्टच आहे की, देवाचे राज्य तुमच्याकडे आले आहे. 21जेव्हा एखादा बलवान मनुष्य आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी पूर्ण शस्त्रसामग्री बाळगतो तेव्हा त्याची मालमत्ता सुरक्षित राहते. 22परंतु कोणी त्याच्याहीपेक्षा अधिक बलवान त्याच्यावर हल्ला करून त्याचा पराभव करतो, तेव्हा ज्या शस्त्रसामग्रीवर त्याने विश्वास ठेवला होता, ती तो घेऊन जातो व त्यास मिळालेली लूट आपल्या मित्रांना वाटतो. 23जो माझ्या पक्षाचा नाही, तो माझ्याविरुद्ध आहे आणि जो माझ्याबरोबरीने गोळा करीत नाही, तर तो उधळून टाकतो.
अपुऱ्या सुधारणेपासून उद्भवणारा धोका
मत्त. 12:43-45
24 जेव्हा अशुद्ध आत्मा मनुष्याबाहेर येतो व ते विसावा घेण्यासाठी निर्जल प्रदेशात जागा शोधते. पण त्यास ती विश्रांती मिळत नाही. तेव्हा तो म्हणतो, ‘मी ज्या घरातून बाहेर आलो त्या घरात परत जाईन.’ 25तो त्या घराकडे परत जातो आणि तेव्हा त्यास ते घर झाडून नीटनेटके केलेले आढळते. 26नंतर तो जातो आणि आपणापेक्षा अधिक बळकट व दुष्ट असे सात आत्मे घेतो आणि ते त्या घरात जातात आणि तेथेच राहतात. तेव्हा त्या मनुष्याची शेवटची अवस्था पहिल्यापेक्षा वाईट होते.” 27तो या गोष्टी बोलला तेव्हा असे घडले की, गर्दीतील एक स्त्री मोठ्याने ओरडून त्यास म्हणाली, “धन्य ते गर्भाशय, ज्याने तुझा भार वाहिला व धन्य ती स्तने जी तू चोखलीस.” 28परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!”
चिन्ह मागण्याविषयी दिलेला इशारा
मत्त. 12:38-42
29जसजसा लोकसमुदाय वाढू लागला, तेव्हा तो बोलू लागला, “ही पिढी दुष्ट पिढी आहे. ती चिन्ह मागत आहे आणि योनाच्या चिन्हाशिवाय कोणतेही चिन्ह तिला दिले जाणार नाही. 30कारण जसा योना निनवेच्या लोकांकरिता चिन्ह होता तसा मनुष्याचा पुत्रही या पिढीसाठी चिन्ह होईल. 31दक्षिणेकडची राणी न्यायाच्या दिवशी या पिढीबरोबर उठून त्यांना दोषी ठरवील कारण ती पृथ्वीच्या टोकाकडून शलमोनाचे शहाणपण ऐकण्यासाठी आली आणि पाहा, शलमोनापेक्षाही थोर असा एक येथे आहे. 32न्यायाच्या दिवशी निनवेचे लोक या पिढीबरोबर उभे राहून हिला दोषी ठरवतील कारण योनाचा उपदेश ऐकून त्यांनी पश्चात्ताप केला आणि पाहा, योनापेक्षाही थोर असा एक येथे आहे.”
दिव्यावरून धडे
मत्त. 6:22, 23
33 “कोणीही दिवा लावून तळघरात किंवा भांड्याखाली ठेवत नाहीत, तर आत येणाऱ्यांना प्रकाश दिसवा म्हणून तो दिवठणीवर ठेवतात. 34डोळा हा तुमच्या शरीराचा दिवा आहे. जर तुमचे डोळे चांगले आहेत, तर तुमचे शरीरही प्रकाशाने भरलेले आहे. 35पण ते जर वाईट आहेत तर तुमचे शरीर अंधकारमय आहेत म्हणून तुमच्यातला प्रकाश हा अंधार तर नाही ना, याची काळजी घ्या. 36जर तुमचे सर्व शरीर प्रकाशमय आहे आणि त्याच्यातील कोणताही भाग अंधकारमय नाही तर, जशी दिव्याची प्रकाशकिरणे तुला प्रकाश देतात, तसे ते तुला पूर्णपणे प्रकाशित करील.”
परूशी व शास्त्री यांचा निषेध
37येशूने आपले बोलणे संपविले तेव्हा एका परूश्याने त्यास आपल्या घरी येऊन स्वतः बरोबर जेवायला बोलावले. तो आत गेला आणि आपल्या जागी जेवायला बसला. 38परंतु त्याने जेवणापूर्वी हात धुतले नाहीत हे पाहून परूश्याला फार आश्चर्य वाटले. 39तेव्हा प्रभू त्यास म्हणाला, “तुम्ही परूशी प्याला व ताट बाहेरुन साफ करता पण तुम्ही आतून लोभीपणाने व दुष्टतेने भरलेले आहात. 40अहो बुद्धीहीन मनुष्यांनो! ज्याने बाहेरील बाजू बनवली त्यानेच आतली बाजू बनवली नाही का? 41पण जे आतमध्ये आहे, ते गरीबांना द्या आणि नंतर सर्वकाही तुमच्यासाठी शुद्ध होईल.
42 परंतु तुम्हा परूश्यांना हाय असो कारण तुम्ही पुदिना, जीरे व प्रत्येक भाजीपाल्याचा दशांश देता. परंतु तुम्ही न्याय आणि देवाविषयीचे प्रीती याकडे दुर्लक्ष करता. तुम्ही नितीने जगावे व देवावर प्रीती करणे या गोष्टी प्रथम करणे आवश्यक आहे त्याचवेळेस इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करू नये. 43तुम्हा परूश्यांची केवढी दुर्दशा होणार, कारण तुम्हास सभास्थानातील महत्त्वाच्या जागी बसणे आणि बाजारात नमस्कार घेणे आवडते. 44तुमची केवढी दुर्दशा होणार! कारण तुम्ही न दिसणाऱ्या कबरासारखे आहात, अशा कबरांवर लोक नकळत पाय देऊन चालतात.”
45एक नियमशास्त्राचा शिक्षक येशूला म्हणाला, “गुरुजी, तुम्ही असे बोलता तेव्हा तुम्ही आमचासुद्धा अपमान करता.” 46तेव्हा येशू म्हणाला, “नियमशास्त्राच्या शिक्षकांनो तुमचाही धिक्कार असो, कारण तुम्ही लोकांस वाहण्यास कठीण असे ओझे त्यांच्यावर लादता व ते उचलण्यास तुमच्या एका बोटानेसुद्धा मदत करीत नाही. 47तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या संदेष्ट्यासाठी तुम्ही कबरा बांधता. 48असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. 49यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’ 50तर, संदेष्ट्याचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल. 51होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे भवन व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल. 52तुम्हा नियमशास्त्र शिक्षकांची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही ज्ञानाची किल्ली घेऊन गेला, तुम्ही स्वतः आत गेला नाहीत आणि जे आत जाण्याचा प्रयत्न करत होते, त्यांनाही जाऊ दिले नाही.”
53येशू तेथून निघून जात असता नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याचा फार विरोध करू लागले व त्यास अनेक गोष्टींविषयी प्रश्न विचारु लागले. 54तो जे बोलेल त्या शब्दांमध्ये त्यास पकडण्यासाठी ते टपून होते.
Currently Selected:
लूक 11: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.