शास्ते 20
20
बन्यामीन वंशजांविरुद्ध युद्ध
1नंतर दान प्रदेशापासून बैर-शेबा शहरापर्यंतचे व गिलाद देशातले सर्व इस्राएली लोक बाहेर आले आणि ते एक मनाचे होऊन परमेश्वराजवळ मिस्पा येथे एकत्र जमा झाले. 2इस्राएलाच्या सर्व वंशांच्या लोकांचे पुढारी, यांनी देवाच्या लोकांच्या मंडळीत आपले स्थान घेतले, सुमारे चार लाख पायदळ, जे तलवारीने लढण्यास तयार होते. 3आता बन्यामिनी लोकांनी ऐकले की, इस्राएल लोक मिस्पात नगरात जमले आहेत. तेव्हा इस्राएलाचे लोक म्हणाले, “आम्हांला सांगा, ही वाईट गोष्ट कशी घडली?” 4तो लेवी, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता तिच्या पतीने उत्तर देऊन म्हटले, “मी आणि माझी उपपत्नी बन्यामिनाच्या प्रदेशातील गिबा येथे रात्र घालवण्यासाठी येऊन उतरलो. 5गिबातल्या लोकांनी रात्री माझ्यावर हल्ला करण्यासाठी घराच्या सभोवताली वेढा दिला आणि मला मारण्याचा त्यांचा हेतू होता. त्यांनी माझ्या उपपत्नीवर बलात्कार केला आणि ती मरण पावली. 6मी आपल्या उपपत्नीला घेऊन तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, आणि ते इस्राएलाच्या वतन भागातील सर्व प्रांतांत पाठवले. कारण, त्यांनी इस्राएलात दुष्टपणा आणि बलात्कार केला आहे. 7आता तुम्ही, सर्व इस्राएली लोकांनो, बोला आणि तुमचा सल्ला द्या आणि याकडे लक्ष द्या.” 8सर्व लोक एक मन होऊन एकत्र उठले आणि ते म्हणाले, “आमच्यातला कोणीही आपल्या तंबूकडे जाणार नाही आणि कोणी आपल्या घरी परतणार नाही. 9परंतु आता आम्ही गिब्याचे हे असे करणार आहोत. आम्ही चिठ्ठ्या टाकून मार्गदर्शन घेतल्यावर हल्ला करायचे ठरवू. 10आम्ही इस्राएलाच्या सर्व वंशांतून शंभरातली दहा माणसे व हजारातून शंभर, व दहा हजारातून एक हजार, इतकी माणसे निवडू. ती या लोकांसाठी अन्नसामग्री आणतील, म्हणजे मग ते जाऊन बन्यामिनाच्या गिब्याने इस्राएलात जे दुष्टपण केले, त्यानुसार त्यांना शिक्षा करतील.” 11मग इस्राएलातले सर्व सैन्य एका उद्देशाने एकत्र येऊन त्या नगराविरुद्ध जमले. 12तेव्हा इस्राएल लोकांनी बन्यामिनाच्या सर्व वंशांत माणसे पाठवून विचारले, “तुमच्यामध्ये हे काय दुष्टपण घडले आहे? 13तर आता तुम्ही गिब्यांतली जे दुष्ट लोक आहेत ते आम्हांला काढून द्या, म्हणजे आम्ही त्यांना जीवे मारू आणि इस्राएलातून दुष्टाई पूर्णपणे काढून टाकू.” परंतु बन्यामिनी लोकांनी आपले भाऊबंद इस्राएली लोक यांचे ऐकले नाही. 14आणि बन्यामिनी लोक इस्राएली लोकांविरुद्ध लढावयास आपल्या नगरांतून गिब्याजवळ जमा झाले. 15त्या दिवशी बन्यामिनी लोकांनी आपल्या नगरांतून तलवारीने लढाई करण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले सव्वीस हजार सैन्य बरोबर घेतले; त्यामध्ये गिब्यात राहणाऱ्या त्या सातशे निवडक पुरुषांची भर घातली. 16त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे. 17बन्यामिनी सोडून, एकंदर इस्राएली सैन्य चार लाख माणसे, तलवारीने लढण्याचे शिक्षण घेऊन तयार झालेले होते. ते सर्व लढाऊ पुरुष होते. 18मग इस्राएल लोक उठून बेथेलापर्यंत गेले, आणि त्यांनी देवापासून सल्ला विचारला. त्यांनी विचारले, “बन्यामिनी लोकांशी लढायला आमच्यातून पहिल्याने कोणी जावे?” परमेश्वर देवाने सांगितले, “यहूदाने पहिल्याने जावे.” 19इस्राएली लोक सकाळी उठले आणि त्यांनी गिब्यासमोर लढाईची तयारी केली. 20मग इस्राएली सैन्य बन्यामिन्यांविरुद्ध लढायला बाहेर गेले, त्यांनी त्यांच्या विरुद्ध गिबा या ठिकाणी लढाईची व्यूहरचना केली. 21तेव्हा बन्यामिनी सैन्याने गिब्यातून निघून आणि त्या दिवशी इस्राएली सैन्यातील बावीस हजार मनुष्यांना मारले. 22तथापि इस्राएली सैन्याने पुन्हा शक्तीशाली होऊन जेथे त्यांनी पहिल्या दिवशी लढाई लावली होती, त्या ठिकाणीच व्यूहरचना केली. 23आणि इस्राएली लोक वर गेले आणि परमेश्वरासमोर संध्याकाळपर्यंत रडले. आणि त्यांनी परमेश्वरास विचारले, “आमचा बंधू बन्यामीन याच्या लोकांशी लढण्यास मी पुन्हा जावे काय?” परमेश्वर म्हणाला, “त्यांच्यावर हल्ला करा.” 24म्हणून दुसऱ्या दिवशी इस्राएली सैन्य बन्यामिनी सैन्याविरुद्ध चालून गेले. 25दुसऱ्या दिवशी, बन्यामिनी लोक गिब्यातून त्यांच्याविरुद्ध बाहेर आले, आणि त्यांनी इस्राएली सैन्यातील अठरा हजार मनुष्यांना मारले, हे सर्व तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले होते. 26नंतर सर्व इस्राएली सैन्य आणि सर्व लोक चढून बेथेल येथे गेले आणि रडले, आणि त्यांनी तेथे परमेश्वर देवासमोर बसले. त्यांनी त्या दिवशी संध्याकाळपर्यंत उपास केला, आणि परमेश्वरास होमार्पण व शांत्यर्पणे अर्पण केले. 27आणि इस्राएली लोकांनी परमेश्वर देवाला विचारले, कारण त्या दिवसात देवाच्या कराराचा कोश तेथे होता. 28आणि अहरोनाचा पुत्र एलाजार याचा पुत्र फिनहास त्या दिवसात त्याची सेवा करत होता. “आम्ही आपला बंधू बन्यामीन याच्या लोकांविरुद्ध लढण्यास परत जावे काय किंवा थांबावे?” तेव्हा परमेश्वर देव म्हणाला, “तुम्ही चढून जा; कारण उद्या मी तुम्हाला त्यांचा पराजय करण्यास मदत करीन.” 29मग इस्राएल लोकांनी गिब्याच्या भोवताली गुप्तस्थळी माणसे ठेवली. 30मग तिसऱ्या दिवशी इस्राएली लोक बन्यामिनाच्या लोकांविरुद्ध लढले, आणि पूर्वीप्रमाणे त्यांनी गिब्याजवळ व्यूहरचना केली. 31तेव्हा बन्यामीनी लोक गेले आणि इस्राएल लोकांविरूद्ध लढले आणि त्यांना नगरापासून काढून घेऊन दूर नेण्यात आले. त्यांनी काही लोकांस मारण्यास सुरवात केली. त्यातला एक रस्ता बेथेलास आणि दुसरा गिब्याकडे जातो, त्यामध्ये इस्राएलांपैकी सुमारे तीस पुरुष शेतात त्यांनी मारले; 32बन्यामिनी लोकांनी म्हटले, “त्यांचा पराजय झाला आहे, आणि पहिल्यासारखे ते आमच्यापुढून पळून जात आहेत.” परंतु इस्राएली सैन्य म्हणाले, “आपण मागे पळू आणि त्यांना नगरातल्या रस्त्या पासून दूर काढून आणू.” 33सर्व इस्राएली सैन्य त्यांच्या जागेवरून उठले आणि त्यांनी बआल-तामार येथे लढाईसाठी व्यूहरचना केली. नंतर जे इस्राएली सैन्य गुप्तस्थळीं लपून बसले होते ते आपल्या जागेवरून, मारे गिबा येथून अचानक उठले. 34सर्व इस्राएलातले निवडलेले दहा हजार पुरुष गिब्यापुढे आले आणि भयंकर लढाई झाली, तथापि बन्यामिन्यांना समजले नव्हते की, आपत्ती आपल्याजवळ येऊन ठेपली आहे. 35तेव्हा परमेश्वर देवाने बन्यामिनाला इस्राएलापुढे पराजित केले. त्या दिवशी बन्यामिन्यांचे पंचवीस हजार शंभर पुरुष मारले गेले. त्या सर्वांना तलवारीने लढण्याचे शिक्षण देण्यात आले होते. 36बन्यामिनी लोकांनी पाहिले की आपण पराजित झालो आहोत. हे असे झाले की इस्राएली मनुष्यांनी गिब्यावर जे दबा धरून ठेवले होते, त्यांचा भरवसा धरला म्हणून ती बन्यामिनी मनुष्यांपुढून बाजूला झाली. 37नंतर दबा धरून बसणारे उठले आणि पटकन ते गिब्यात गेले आणि त्यांनी त्यांच्या तलवारीने नगरात राहणाऱ्या प्रत्येकाला ठार मारले. 38आता दबा धरणारे आणि इस्राएली सैन्यात सांकेतिक खूण ठरली होती की त्यांनी नगरातून उंच धुराचा उंच लोळ चढवावा. 39आणि इस्राएली सैन्य लढाईत मागे फिरू लागले; आता बन्यामिन्याने हल्ल्याला सुरवात केली आणि इस्राएलांतली सुमारे तीस माणसे मारली. आणि त्यांनी म्हटले, “खात्रीने पाहिल्या लढाईसारखे ते आमच्यापुढे पराजित झालेत.” 40परंतु नगरातून धुराचा लोळ उंच चढू लागला, तेव्हा बन्यामिन्यांनी आपल्या पाठीमागे वळून पाहिले आणि संपूर्ण नगरातून धुराचा लोळ आकाशात चढत असल्याचे त्यांना दिसले. 41नंतर इस्राएली सैन्य मागे उलटून त्यांच्यावर हल्ला चढवला. बन्यामिनी माणसे फार घाबरली, कारण त्यांनी पाहिले की, आपल्यावर अरिष्ट आले आहे, हे त्यांच्या लक्षात आले. 42यास्तव ते इस्राएलाच्या सैन्यापुढून रानाच्या वाटेने निसटून पळाले; तथापि लढाईने त्यांना गाठले. इस्राएलाच्या सैन्याने बाहेर येऊन, जेथे कोठे ते गावातून बाहेर निघाले होते तेथे त्यांना मारले. 43त्यांनी बन्यामिन्यांना चोहोकडून वेढले आणि नोहा येथपासून ते त्यांच्या पाठीस लागले; त्यांनी गिब्यासमोर पूर्वेकडे त्यांना पायदळी तुडवून मारले. 44बन्यामिनातले अठरा हजार सैनिक मारले गेले; ती सर्व माणसे लढाईत पटाईत होती. 45जे मागे फिरले ते रानात रिम्मोन खडकाकडे पळून गेले. तथापि त्यांनी त्यातले पाच हजार पुरुष रस्त्यावर वेचून मारले, आणि गिदोमापर्यंत त्यांचा पाठलाग करून त्यातले दोन हजार पुरुष आणखी मारले. 46त्या दिवशी बन्यामिनातले जे सर्व पडले ते तलवारीने लढाईचे शिक्षण घेतलेले आणि अनुभवी असे पंचवीस हजार पुरुष होते; ते सर्व लढाईत प्रसिद्ध शूर लोक होते. 47परंतु सहाशे पुरुष फिरून रानात रिम्मोन खडकावर पळून गेले. आणि ते रिम्मोन खडकावर चार महिने राहिले. 48नंतर इस्राएली सैन्यांनी मागे फिरून बन्यामिनी लोकांवर हल्ला केला आणि नगरातली सर्व माणसे व गुरेढोरे आणि जे काही त्यांना सापडले ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तलवारीने मारली, आणि त्यांच्या मार्गातील प्रत्येक नगर त्यांनी आग लावून जाळून टाकले.
Currently Selected:
शास्ते 20: IRVMar
Highlight
Share
Copy
Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in
MAR-IRV
Creative Commons License
Indian Revised Version (IRV) - Marathi (इंडियन रिवाइज्ड वर्जन - मराठी), 2019 by Bridge Connectivity Solutions Pvt. Ltd. is licensed under a Creative Commons Attribution-ShareAlike 4.0 International License. This resource is published originally on VachanOnline, a premier Scripture Engagement digital platform for Indian and South Asian Languages and made available to users via vachanonline.com website and the companion VachanGo mobile app.