YouVersion Logo
Search Icon

उत्प. 35

35
बेथेल येथे देव याकोबाला आशीर्वाद देतो
1देव याकोबाला म्हणाला, “ऊठ, बेथेल नगरामध्ये जा आणि तेथे राहा. तुझा भाऊ एसाव याजपासून तू पळून जात असताना ज्याने तुला दर्शन दिले, त्या देवासाठी तेथे एक वेदी बांध.” 2तेव्हा याकोब आपल्या घरातील सर्व मंडळीला व आपल्याबरोबरच्या सगळ्यांना म्हणाला, “तुमच्याजवळ असलेल्या परक्या देवांचा त्याग करा. तुम्ही स्वतःला शुद्ध करा. आपले कपडे बदला. 3नंतर आपण येथून निघून बेथेलास जाऊ. मी दुःखात असताना ज्याने मला उत्तर दिले आणि जेथे कोठे मी गेलो तेथे जो माझ्याबरोबर होता, त्या देवासाठी मी वेदी बांधीन.” 4तेव्हा त्या लोकांनी त्यांच्या हातातले सर्व परके देव आणि आपल्या कानातील कुंडलेही आणून याकोबाला दिली. तेव्हा याकोबाने त्या सर्व वस्तू शखेम नगराजवळील एला झाडाच्या खाली पुरून टाकल्या. 5ते तेथून निघाले, त्यांच्या सभोवतालच्या नगरावर देवाने भीती उत्पन्न केली, म्हणून त्यांनी याकोबाच्या मुलांचा पाठलाग केला नाही. 6अशा रीतीने याकोब व त्याच्याबरोबरचे सर्व लोक कनान देशात लूज येथे येऊन पोहचले त्यालाच आता बेथेल म्हणतात. 7त्याने तेथे एक वेदी बांधली, व त्या ठिकाणाचे नाव “एल-बेथेल#अर्थ-बेथेलचा देव ” असे ठेवले. कारण आपला भाऊ एसाव याजपासून पळून जाताना याच जागी प्रथम देवाने त्यास दर्शन दिले होते. 8रिबकेची दाई दबोरा या ठिकाणी मरण पावली तेव्हा त्यांनी तिला बेथेल येथे अल्लोन झाडाच्या खाली पुरले; त्या जागेचे नाव त्यांनी अल्लोन बाकूथ म्हणजे रडण्याचे अल्लोन असे ठेवले. 9याकोब पदन-अराम येथून परत आला, तेव्हा देवाने त्यास पुन्हा दर्शन दिले आणि त्यास आशीर्वाद दिला. 10देव त्यास म्हणाला, “तुझे नाव याकोब आहे, परंतु तुला आता याकोब म्हणणार नाहीत तर तुझे नवे नाव इस्राएल असे होईल.” म्हणून देवाने त्यास इस्राएल हे नाव दिले. 11देव त्यास म्हणाला, “मी सर्व सर्वसमर्थ देव आहे. तू फलद्रूप आणि बहुगुणित हो. तुझ्यातून एक राष्ट्र आणि राष्ट्रांचा समुदाय येईल व तुझ्या वंशजातून राजे जन्मास येतील. 12मी अब्राहाम व इसहाक यांना जो देश दिला, तो आता मी तुला व तुझ्यामागे राहणाऱ्या तुझ्या संततीला देतो.” 13मग देव ज्या ठिकाणी त्याच्याशी बोलला तेथूनच वर निघून गेला. 14मग याकोबाने तेथे स्मारक म्हणून दगडाचा एक स्तंभ उभा केला त्याने त्यावर पेयार्पण व तेल ओतले. 15जेथे देवाने याकोबाशी भाषण केले होते त्या स्थानाचे नाव याकोबाने बेथेल ठेवले.
राहेलीचा मृत्यू
16मग ते बेथेल येथून पुढे निघाले, ते एफ्राथ गावापासून काही अंतरावर आले असताना तेथे राहेलीस प्रसूतीवेदना सुरू झाल्या. तिला प्रसुतीच्या असह्य वेदना होत होत्या. 17राहेलीस प्रसूतीवेदनांचा अतिशय त्रास होत असताना, राहेलीची सुईण तिला म्हणाली, “भिऊ नकोस कारण तुला हाही मुलगाच होईल.” 18त्या मुलाला जन्म देताना राहेल मरण पावली, परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेन#अर्थ-माझ्या दुःखाचा पुत्रओनी असे ठेवले, परंतु त्याच्या वडिलाने त्याचे नाव बन्यामीन #अर्थ-माझ्या शक्तीचा पुत्रअसे ठेवले. 19राहेल मरण पावली. एफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गावास जाणाऱ्या वाटेजवळ राहेलीस पुरले. 20आणि याकोबाने तिचे स्मारक म्हणून तिच्या कबरेवर एक स्तंभ उभा केला. तो स्तंभ आजपर्यंत तेथे कायम आहे. 21त्यानंतर इस्राएल पुढे गेला आणि मिगदाल-एदेरच्या पलीकडे त्याने तळ दिला. 22इस्राएल त्या देशात राहत होता, त्या वेळी रऊबेन, आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्यापाशी निजला, हे इस्राएलाने ऐकले. याकोबाला बारा पुत्र होते.
याकोबाचे पुत्र
1 इति. 2:1-2
23त्यास लेआपासून झालेले पुत्र: याकोबाचा ज्येष्ठ मुलगा रऊबेन आणि शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार व जबुलून. 24त्यास राहेलीपासून झालेले पुत्र: योसेफ व बन्यामीन. 25त्यास राहेलीची दासी बिल्हापासून झालेले पुत्र: दान व नफताली. 26आणि लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र गाद व आशेर. हे सर्व याकोबाचे पुत्र जे त्यास पदन-अरामात झाले. 27याकोब मग किर्याथ-आर्बा (म्हणजे हेब्रोन) येथीन मम्रे या ठिकाणी आपला बाप इसहाक याजकडे आला. येथेच अब्राहाम व इसहाक हे राहिले होते.
इसहाकाचा मृत्यू
28इसहाक एकशे ऐंशी वर्षे जगला. 29इसहाकाने शेवटचा श्वास घेतला आणि मरण पावला, आणि आपल्या पूर्वजास मिळाला, तो म्हातारा व आयुष्याचे पूर्ण दिवस होऊन मरण पावला. त्याचे पुत्र एसाव व याकोब यांनी त्यास पुरले.

Currently Selected:

उत्प. 35: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in