YouVersion Logo
Search Icon

उत्प. 26

26
गरार आणि बैर-शेबा येथे इसहाक
उत्प. 12:10-20; 20:1-18
1अब्राहामाच्या दिवसात जो पहिला दुष्काळ पडला होता त्यासारखा दुसरा दुष्काळ त्या देशात पडला. तेव्हा इसहाक पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख याजकडे गरार नगरामध्ये गेला. 2परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, “तू मिसर देशात खाली जाऊ नकोस; जो देश मी तुला सांगेन त्यामध्येच राहा. 3या देशात उपरी म्हणून राहा आणि मी तुझ्याबरोबर असेन आणि मी तुला आशीर्वाद देईन; कारण हे सर्व देश मी तुझ्या वंशजाला देईन, आणि तुझ्या बाप अब्राहाम याला शपथ घेऊन जे वचन दिले आहे ते सर्व मी पूर्ण करीन. 4मी तुझे वंशज आकाशातील ताऱ्यांइतके बहुगुणित करीन आणि हे सर्व देश मी तुझ्या वंशजांना देईन. तुझ्या वंशजांद्वारे पृथ्वीवरील सर्व राष्ट्रे आशीर्वादित होतील. 5मी हे करीन कारण अब्राहामाने माझा शब्द पाळला आणि माझे विधी, माझ्या आज्ञा, माझे नियम व माझे कायदे पाळले.” 6म्हणून मग इसहाक गरारातच राहिला. 7जेव्हा तेथील लोकांनी त्याच्या पत्नीविषयी त्यास विचारले, तेव्हा तो म्हणाला, “ती माझी बहीण आहे.” “ती माझी पत्नी आहे,” असे म्हणण्यास तो घाबरला. कारण त्याने विचार केला की, “रिबकेला मिळविण्यासाठी या ठिकाणचे लोक माझा घात करतील, कारण ती दिसायला इतकी सुंदर आहे.” 8इसहाक बराच काळ तेथे राहिल्यावर, पलिष्ट्यांचा राजा अबीमलेख ह्याने एकदा खिडकीतून बाहेर पाहताना पाहिले की, इसहाक त्याच्या पत्नीला रिबकेला प्रेमाने कुरवाळत आहे. 9अबीमलेखाने इसहाकाला बोलावले आणि म्हणाला, “पाहा नक्कीच ही तुझी पत्नी आहे. मग, ‘ती तुझी बहीण आहे’ असे तू का सांगितलेस?” इसहाक त्यास म्हणाला, “कारण मला वाटले की, तिला मिळविण्यासाठी कोणीही मला मारून टाकेल.” 10अबीमलेख म्हणाला, “तू आम्हांला हे काय केलेस? कारण आमच्या लोकांतून कोणीही तुझ्या पत्नीबरोबर सहज लैंगिक संबंध केला असता, आणि त्यामुळे तू आमच्यावर दोष आणला असतास.” 11म्हणून अबीमलेखाने सर्व लोकांस ताकीद दिली आणि म्हणाला, “जो कोणी या मनुष्यास किंवा याच्या पत्नीला हात लावेल त्यास खचित जिवे मारण्यात येईल.” 12इसहाकाने त्या देशात धान्य पेरले आणि त्याच वर्षी त्यास शंभरपट पीक मिळाले, कारण परमेश्वराने त्यास आशीर्वाद दिला. 13इसहाक धनवान झाला, तो अधिकाधिक वाढत गेला आणि खूप महान होईपर्यंत वाढत गेला. 14त्याच्याकडे पुष्कळ मेंढरे व गुरेढोरे, मोठा कुटुंबकबिला होता. त्यावरून पलिष्टी त्याचा हेवा करू लागले; 15म्हणून त्याच्या वडिलाच्या हयातीत पूर्वी त्याच्या नोकरांनी खणलेल्या सर्व विहिरी पलिष्ट्यांनी मातीने बुजवल्या होत्या. 16तेव्हा अबीमलेख इसहाकास म्हणाला, “तू आमचा देश सोडून निघून जा कारण आमच्यापेक्षा तू अधिक शक्तीमान झाला आहेस.” 17म्हणून इसहाकाने तो देश सोडला व गराराच्या खोऱ्यात त्याने तळ दिला आणि तेथेच राहिला. 18अब्राहामाने आपल्या दिवसात ज्या पाण्याच्या विहिरी खणल्या होत्या, परंतु अब्राहामाच्या मरणानंतर त्या पलिष्टी लोकांनी मातीने बुजविल्या होत्या त्या पुन्हा एकदा इसहाकाने खणून घेतल्या, आणि त्याच्या वडिलाने दिलेली नावेच पुन्हा त्याने दिली. 19जेव्हा इसहाकाच्या नोकरांनी एक विहीर खोऱ्यात खणली, तेव्हा त्या विहिरीत त्यांना एक जिवंत पाण्याचा झरा लगला. 20गरार खोऱ्यातील गुराख्यांनी इसहाकाच्या गुराख्यांशी भांडणे केली, ते म्हणाले, “हे पाणी आमचे आहे.” ते त्याच्याशी भांडले म्हणून इसहाकाने त्या विहिरीचे नाव “एसेक#अर्थ-तंटा” ठेवले. 21मग त्यांनी दुसरी विहीर खणली, आणि तिच्यावरूनही ते भांडले म्हणून त्याने तिचे नाव “सितना” ठेवले. 22तो तेथून निघाला आणि त्याने आणखी एक विहीर खणली, परंतु तिच्यासाठी ते भांडले नाहीत म्हणून त्याने तिचे नाव रहोबोथ #अर्थ-मोठी जागाठेवले. आणि तो म्हणाला, “आता परमेश्वरने आम्हासाठी जागा शोधून दिली आहे, आणि देशात आमची भरभराट होईल.” 23नंतर तेथून इसहाक बैर-शेबा येथे गेला. 24त्याच रात्री परमेश्वराने इसहाकाला दर्शन देऊन म्हटले, “मी तुझा बाप अब्राहाम याचा देव आहे. भिऊ नकोस, कारण मी तुझ्याबरोबर आहे आणि माझा सेवक अब्राहाम याच्यासाठी मी तुला आशीर्वादित करीन व तुझे वंशज बहुतपट करीन.” 25तेव्हा इसहाकाने तेथे वेदी बांधली व परमेश्वराच्या नावाने प्रार्थना केली. त्याने तेथे आपला तंबू ठोकला आणि त्याच्या नोकरांनी एक विहीर खणली.
इसहाक आणि अबीमलेख ह्यांच्यातील सलोखा
26नंतर गराराहून अबीमलेख, त्याचा मित्र अहुज्जाथ व त्याच्या सैन्याचा सेनापती पिकोल हे त्याच्याकडे गेले. 27इसहाकाने त्यांना विचारले, “तुम्ही माझा द्वेष करता व मला तुम्ही आपणापासून दूर केलेत; तर आता तुम्ही माझ्याकडे का आलात?” 28आणि ते म्हणाले, “परमेश्वर तुझ्याबरोबर आहे हे आम्हांला स्पष्टपणे दिसून आले आहे. म्हणून आम्ही ठरवले आहे की, आपणांमध्ये म्हणजे आम्हामध्ये व तुझ्यामध्ये तह असावा. म्हणून तू आम्हाबरोबर करार कर, 29जसे आम्ही तुझी हानी केली नाही, आणि आम्ही तुझ्याशी चांगले वागलो आणि तुला शांतीने पाठवले, तशी तू आम्हास हानी करू नको. खरोखर परमेश्वराने तुला आशीर्वादित केले आहे.” 30तेव्हा इसहाकाने त्यांना मेजवानी दिली, त्यांनी आनंदाने खाणे पिणे केले. 31दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून एकमेकांशी शपथ वाहिली. नंतर इसहाकाने त्यांना रवाना केले आणि ते शांतीने त्याच्यापासून गेले. 32त्याच दिवशी इसहाकाच्या नोकरांनी येऊन त्यांनी खणलेल्या विहिरीविषयी त्यास सांगितले. ते म्हणाले, “त्या विहिरीत आम्हांस पाणी मिळाले आहे.” 33तेव्हा इसहाकाने त्या विहिरीचे नाव शेबा #अर्थ-करारठेवले, आणि त्या नगराला अजूनही बैर-शेबा नाव आहे. 34एसाव चाळीस वर्षांचा झाल्यावर त्याने हेथी स्त्रियांशी लग्ने केली, एकीचे नाव होते यहूदीथ, ही बैरी हित्तीची मुलगी, आणि दुसरीचे नाव होते बासमथ, ही एलोन हित्तीची मुलगी होती. 35त्यामुळे इसहाक व रिबका दुःखीत झाले.

Currently Selected:

उत्प. 26: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in