YouVersion Logo
Search Icon

एज्रा 3

3
उपासनेची प्रस्थापना
1इस्राएली लोक बंदिवासातून परतल्यानंतर आपापल्या नगरात सातवा महिना सुरु झाल्यावर, ते सर्वजण एकमनाने यरूशलेमेत एकत्र जमले. 2योसादाकाचा मुलगा येशूवा आणि त्याचे भाऊ याजक व शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि त्याचे भाऊ यांनी उठून इस्राएलाच्या देवाला होमार्पणे अर्पिण्यासाठी, देवाचा मनुष्य मोशे याच्या नियमशास्त्रात आज्ञापिल्याप्रमाणे वेदी बांधली.
3मग त्यांनी जुना पाया तसाच ठेवून त्यावर वेदीची स्थापना केली कारण त्यांना देशातील लोकांची खूप भीती वाटत होती. तिच्यावर ते परमेश्वरास सकाळ संध्याकाळ होमार्पणे अर्पण करू लागले. 4मग त्यांनी मंडपाचा सण शास्त्रात लिहिल्याप्रमाणे पाळला आणि प्रत्येक दिवसाची होमार्पणे त्याच्या विधीप्रमाणे जशी नेमलेली होती तशी रोज अर्पण केली. 5त्यानंतर दररोजचे होमार्पण, चंद्रदर्शन याप्रकारे परमेश्वराने पवित्र केलेल्या सर्व नेमलेल्या सणांचे होमार्पण त्याबरोबर स्वखुशीने करायचे सर्व अर्पण केले.
6अशाप्रकारे, अजून मंदिराचा पाया बांधून झालेला नसतांनाही सातव्या महिन्याच्या पहिल्या दिवसापासून परमेश्वरास होमार्पण अर्पण करायला सुरुवात केली. 7त्यांनी दगडकाम करणाऱ्यांना आणि सुतारांना चांदी दिली आणि त्यांना पारसाचा राजा कोरेश याच्या परवानगीने गंधसरूची लाकडे लबानोनातून याफोच्या समुद्रास आणावी म्हणून सोरी आणि सीदोनाच्या लोकांस अन्न, पेय व तेलही दिले.
मंदिराच्या पुनर्रचनेची सुरवात
8शल्तीएलाचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा व त्याचे भाऊ, जे याजक व लेवी होते त्यांनी व बंदीवासातून परत यरूशलेमेस आले होते त्या सर्वांनी दुसऱ्या वर्षी दुसऱ्या महिन्यात कामाला सुरुवात केली. जे लेवी वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे होते त्यांना परमेश्वराच्या मंदीराच्या कामाची देखरेख करण्यासाठी नेमले होते. 9येशूवा आपले मुले आणि त्याचे भाऊ, कदमीएल आणि त्याची मुले, यहूदाचे वंशज हेनादाद आणि त्याचे मुले व त्याचे भाऊ जे लेवी त्यांच्यासहीत देवाच्या मंदिरात कारागिरांवर देखरेख करण्यास उभे राहिले. 10जेव्हा बांधणाऱ्यांनी परमेश्वराच्या मंदिराचा पाया घातला तेव्हा इस्राएलचा राजा दावीद याच्या आज्ञेप्रमाणे याजकांनी आपला याजकीय पोषाख घालून हाती कर्णे घेतले व झांजा वाजवणारे लेवी, आसाफाची मुले परमेश्वराच्या स्तवनासाठी आपापल्या जागी उभे राहिले. 11“तो चांगला आहे! इस्राएलावर त्याची दया सर्वकाळ आहे.” स्तुती आणि उपकार मानत अशी गीते त्यांनी गाईली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या.
12पण यावेळी वृद्ध याजक, लेवी आणि वडिलांच्या घराण्यांतील मुख्य मंडळी यांच्यातले पुष्कळजण जेव्हा या मंदिराचा पाया त्याच्या डोळ्यासमोर घातला गेला तेव्हा ते मोठ्याने रडू लागले, कारण पहिले घर त्यांनी पाहिले होते. इतर लोकांचा आनंदाने जयघोष चालू होता. 13हा आवाज बऱ्याच दूरपर्यंत ऐकू जात होता. एकंदर आवाज एवढा मोठा होता की, त्यातला रडण्याचा आवाज कोणता व आनंदाचा आवाज कोणता हे ओळखू येत नव्हते.

Currently Selected:

एज्रा 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in