YouVersion Logo
Search Icon

यहे. 37

37
शुष्क अस्थींचे खोरे
1परमेश्वराचा हात माझ्यावर आला, परमेश्वराच्या आत्म्याकडून मला बाहेर उचलून नेले आणि खाली दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती हाडांनी भरलेली होती. 2मग त्याने मला त्यामधून गोल व गोल चालवले. पाहा! दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होती. आणि पाहा! ती हाडे अगदी सुकलेली होती. 3तो मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे पुन्हा जिवंत होऊ शकतील का?” मग मी म्हणालो, “प्रभू परमेश्वरा, फक्त तुलाच माहीत आहे.” 4मग तो मला म्हणाला, “त्या हाडांविषयी भविष्य सांग आणि त्यांना म्हण, सुकलेल्या हाडांनो परमेश्वराचे वचन ऐका. 5प्रभू परमेश्वर या हाडांस असे म्हणतो, पाहा, मी तुमच्यात श्वास #आत्माघालीन व तुम्ही जिवंत व्हाल. 6मी तुमच्यावर स्नायू लावीन आणि मांस चढवीन आणि मी तुम्हास त्वचेने आवरण घालीन आणि तुमच्यात श्वास घालीन, म्हणजे तुम्ही जिवंत व्हाल. मग तुम्हास समजेल की मीच प्रभू परमेश्वर आहे.” 7म्हणून मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी भविष्य सांगितले; जसे मी भविष्य सांगत असता, आवाज आला. पाहा भूकंप होऊन हाडांना हाड लागून एकमेकांशी जवळ येऊन जोडली गेली. 8मी पाहिले आणि पाहा, तेव्हा त्यांच्यावर स्नायू होते. आणि मांस चढले व त्यावर त्वचेने आवरण घातले. पण त्यांच्यात अजून श्वास नव्हता. 9मग परमेश्वर मला म्हणाला, “मानवाच्या मुला वाऱ्याला भविष्य सांग, भविष्य सांग आणि म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, हे वाऱ्या तू चोहो दिशेने ये व वधलेल्यावर फुंकर घाल म्हणजे ते पुन्हा जिवंत होतील.” 10मग मला आज्ञा केल्याप्रमाणे मी भविष्य सांगितले, तेव्हा त्यामध्ये श्वास येऊन ते जिवंत झाले व ते अतिशय मोठे सैन्य आपल्या पायावर उभे राहिले. 11आणि देव मला म्हणाला, “मानवाच्या मुला, ही हाडे म्हणजे सर्व इस्राएल घराणेच आहे. पाहा ते म्हणतात, आमची हाडे सुकून गेली आहेत. आम्हास आशा राहिलेली नाही. आम्हास नाशासाठी कापून टाकले आहे. 12म्हणून भविष्य सांग आणि त्यांना म्हण, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, माझ्या लोकांनो, मी तुमच्या कबरी उघडून तुम्हास कबरीतून बाहेर काढीन. आणि मी तुम्हास इस्राएलाच्या भूमीत परत आणीन. 13माझ्या लोकांनो, जेव्हा मी तुमच्या कबरी उघडीन व त्यातून तुम्हास बाहेर काढीन तेव्हा तुम्हास समजेल की मी परमेश्वर आहे. 14मी तुमच्यात माझा आत्मा #श्वासओतीन म्हणजे मग तुम्ही जिवंत व्हाल. आणि मी तुम्हास तुमच्या स्वतःच्या देशात विसावा देईन. तेव्हा मी परमेश्वर हे बोललो व मी तसे केले हे तुम्हास समजेल, असे परमेश्वर म्हणतो.”
यहूदा व इस्त्राएल ह्यांच्या समेटाविषयी भविष्य
15मग परमेश्वराचे वचन मजकडे आले व म्हणाले, 16तर “मानवाच्या मुला, आता तू आपल्यासाठी एक काठी घे आणि तिच्यावर लिही, यहूदा आणि त्याचे सहकारी इस्राएलाचे लोक यांच्यासाठी. आणि दुसरी काठी घे व तिच्यावर लिही, योसेफासाठी म्हणजे एफ्राईमाची शाखा व त्यांचे सहकारी सर्व इस्राएलाचे लोक यासाठी आहे. 17मग त्या दोन्ही एकत्र आणून त्यांची एक काठी कर म्हणजे त्या तुझ्या हातांत एक होतील. 18जेव्हा तुझे लोक तुझ्याशी बोलतील आणि म्हणतील, या तुझ्या गोष्टींचा अर्थ काय आहे हे आम्हास सांगणार नाहीस काय? 19मग त्यांना सांग की, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, योसेफाची जी काठी एफ्राईमाच्या हाती आहे तिला आणि इस्राएलाचे जे वंश त्यांचे सहकारी आहेत त्यांना घेऊन मी यहूदाच्या काठीबरोबर जोडीन, यासाठी की त्यांना एक काठी करीन आणि ते माझ्या हातांत एक होतील. 20नंतर ज्या काठ्यांवर तू लिहिशील त्या त्यांच्या डोळ्यासमोर तुझ्या हातात धर. 21मग त्यांना सांग, प्रभू परमेश्वर असे म्हणतो, पाहा, मी इस्राएल लोकांस ज्या राष्ट्रांत ते गेले आहेत, तेथून त्यांना मी बाहेर काढीन. मी त्यांना सभोवतालच्या देशातून गोळा करीन. कारण मी त्यांना त्यांच्या देशात आणीन. 22मी या देशात इस्राएलाच्या पर्वतावर त्यांचे एकच राष्ट्र करीन. त्या सर्वांवर एकच राजा राज्य करील. यापुढे ती दोन राष्ट्रे राहणार नाहीत, त्यांचे यापुढे दोन राज्यात विभाजन होणार नाही. 23मग ते यापुढे आपल्या स्वत:ला मूर्तीपुढे वा त्यांच्या तिरस्करणीय वस्तूंनी किंवा त्यांचे कोणतेही पापांनी आपणाला विटाळविणार नाहीत. त्यांनी ज्या आपल्या राहण्याच्या स्थानात पाप केले आहे त्या सर्वातून मी त्यांना तारीन व त्यांना शुद्ध करीन, यासाठी की, ते माझे लोक होतील व मी त्यांचा देव होईन.
24दावीद माझा सेवक त्यांच्यावर राजा होईल. त्या सर्वांवर एकच मेंढपाळ असेल, आणि ते माझ्या निर्णयानुसार चालतील आणि माझे नियम राखून ठेवतील व त्याचे पालन करतील. 25जो देश माझा सेवक याकोब याला मी दिला, जेथे तुमचे पूर्वज राहत होते. त्यामध्ये ते वस्ती करतील, तेथे ते व त्यांची मुले, व त्यांची नातवंडे सर्वकाळ तेथे राहतील. दावीद हा माझा सेवक त्यांचा सर्वकाळचा अधिपती होईन. 26मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन. तो त्यांच्याशी सर्वकाळचा करार होईल. मी त्यांना घेऊन बहुगुणीत करीन आणि मी आपले पवित्र स्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ स्थापीन. 27माझे निवासस्थान त्यांच्यामध्ये राहील. मी त्यांचा देव होईन व ते माझे लोक होतील. 28जेव्हा माझे पवित्रस्थान त्यांच्यामध्ये सदासर्वकाळ राहील, तेव्हा राष्ट्रांना समजेल की, इस्राएलास पवित्र करणारा मी परमेश्वर आहे.”

Currently Selected:

यहे. 37: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in