YouVersion Logo
Search Icon

निर्ग. 1

1
मिसर देशात इस्त्राएल लोकांस सोसावा लागलेला छळ
1याकोबाबरोबर जे इस्राएलाचे पुत्र व त्यांची कुटुंबे मिसर देशात गेली, त्यांची नावे हीः 2रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा 3इस्साखार, जबुलून, बन्यामीन; 4दान, नफताली, गाद व आशेर. 5याकोबाच्या वंशाचे एकूण सत्तरजण होते. योसेफ हा आधीच मिसर देशात होता. 6नंतर योसेफ, त्याचे भाऊ व त्या पिढीतील सर्व मरण पावले. 7इस्राएल लोक फार फलदायी होऊन त्यांची संख्या अतिशय वाढत गेली; ते महाशक्तीशाली झाले आणि सर्व देश त्यांनी भरून गेला. 8नंतर मिसर देशावर नवीन राजा राज्य करू लागला. त्यास योसेफाच्या स्मरणाची काही काळजी नव्हती. 9तो आपल्या लोकांस म्हणाला, “इस्राएली वंशाच्या लोकांकडे पाहा, ते पुष्कळ अधिक आहेत व आपल्यापेक्षा शक्तीमानही झाले आहेत; 10चला, आपण त्यांच्याशी चतुराईने वागू, नाहीतर त्यांची निरंतर अधिक वाढ होईल आणि जर एखादा युद्धाचा प्रसंग आला तर हे लोक आपल्या शत्रूला जाऊन मिळतील; आणि मग ते आपल्याविरुद्ध लढतील आणि देशातून निघून जातील.” 11म्हणून त्याने त्यांना कामाच्या ओझ्याने जाचण्यासाठी त्यांच्यावर मुकादम नेमले. त्यांनी फारोकरता पिथोम व रामसेस ही दोन शहरे इस्राएल लोकांकडून बांधून घेतली; 12पण मिसऱ्यांनी त्यांना जसजसे जाचले तसतसे ते संख्येने अधिकच वाढत गेले व अधिकच पसरले, म्हणून इस्राएल लोकांची त्यांना भीती वाटू लागली. 13आणि मग मिसऱ्यांनी इस्राएल लोकांवर अधिक कष्टाची कामे लादली. 14अशाप्रकारे त्यांनी इस्राएल लोकांचे जीवन फारच कठीण काबाडकष्टांचे व हाल अपेष्टांचे केले; त्यांनी त्यांना विटा बनविण्याची, बांधकामासाठी चुना बनविण्याची तसेच शेतीची व इतर अतिशय कठीण व कष्टाची कामे बळजबरीने करायला लावली.
इस्त्राएली मुलांच्या हत्येचा कट
15मग मिसराचा राजा इब्री सुइणींशी बोलला. त्यांच्यातल्या एकीचे नाव शिप्रा व दुसरीचे पुवा असे होते. 16तो म्हणाला, “तुम्ही इब्री स्त्रियांचे बाळंतपण करत असता, त्या प्रसूत होण्याच्या जागी त्या बसल्या म्हणजे नीट पाहा, आणि त्या स्त्रियांना मुलगी झाली तर तिला जिवंत ठेवा; परंतु त्यांना मुलगा झाला तर त्यास अवश्य मारून टाका.” 17परंतु त्या इब्री सुइणी देवाचे भय व आदर धरून त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्या होत्या, म्हणून त्यांनी मिसरी राजाची आज्ञा मानली नाही; तर त्यांनी जन्मणाऱ्या मुलांनाही जिवंत ठेवले. 18तेव्हा मिसराच्या राजाने त्या सुइणींना बोलावून विचारले, “तुम्ही असे का केले? तुम्ही जन्मलेल्या मुलांना का जिवंत ठेवले?” 19त्या सुइणी फारोला म्हणाल्या, “या इब्री स्त्रिया मिसरच्या स्त्रियांपेक्षा फार ताकदवान आहेत; आम्ही सुइणी त्यांच्याकडे जाऊन पोहचण्यापूर्वीच त्या प्रसूत होतात.” 20त्याबद्दल देवाने त्या सुइणींचे कल्याण केले. इस्राएल लोक तर अधिक वाढून फार बलवान झाले. 21त्या सुइणी देवाचे भय बाळगणाऱ्या होत्या म्हणून त्याने त्यांची घराणे वसवली. 22तेव्हा फारोने आपल्या सर्व लोकांस आज्ञा दिली, “जो प्रत्येक इब्री मुलगा जन्मेल त्यास तुम्ही नाईल नदीमध्ये फेकून द्या, पण प्रत्येक मुलगी मात्र जिवंत ठेवा.”

Currently Selected:

निर्ग. 1: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in