YouVersion Logo
Search Icon

इफि. 2

2
देवाच्या कृपेने तारण मिळते
1आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, 2ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालीरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. 3आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो. 4पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. 5आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. 6आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. 7यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. 8कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, 9आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. 10कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
यहूदी व परराष्ट्रीय ह्यांचे ख्रिस्ती मंडळीत ऐक्य झाले आहे
11म्हणून आठवण करा, एकेकाळी तुम्ही शरीराने परराष्ट्रीय होता आणि ज्यांची शरीराची सुंता मनुष्याच्या हाताने झालेली होती ते लोक स्वतःला सुंती असे म्हणत, ते त्यांना बेसुंती संबोधत. 12त्यावेळी तुम्ही ख्रिस्तापासून वेगळे होता, इस्राएलाच्या बाहेरचे होता, वचनाच्या कराराशी तुम्ही अपरिचित असे होता, तुम्ही तुमच्या भविष्याविषयी आशाविरहित आणि देवहीन असे जगात होता. 13पण आता, ख्रिस्त येशूमध्ये जे तुम्ही एकेकाळी देवापासून दूर होता, पण आता, येशू ख्रिस्तामध्ये ते तुम्ही ख्रिस्ताच्या रक्ताने त्याच्याजवळ आले आहात.
14कारण तोच आमची शांती आहे, त्याने यहूदी आणि विदेशी या दोघांना एक लोक असे केले. त्याच्या देहाने त्याने आम्हास एकमेकांपासून दुभागणारी आडभिंत पाडून टाकली. 15त्याने आज्ञाविधीचे कायदे आणि नियमशास्त्र आपल्या देहाने रद्द केले. यासाठी की स्वतःमध्ये दोघांचा एक नवा मनुष्य निर्माण करून शांती आणावी. 16त्याने वधस्तंभावर वैर जीवे मारून त्याच्याव्दारे एका शरीरात दोघांचा देवाबरोबर समेट करावा. 17ख्रिस्त आला आणि त्याने जे दूर होते त्यांना अणि जे जवळ होते त्यांना शांतीची सुवार्ता सांगितली. 18कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो. 19यामुळे तुम्ही आता परके आणि विदेशी नाही. तर त्याऐवजी तुम्ही पवित्रजनांच्या बरोबरचे सहनागरीक आणि देवाचे कुटुंबीय आहात 20तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाच्या पायावर बांधलेली इमारत आहात आणि ख्रिस्त येशू स्वतः तिचा कोनशिला आहे. 21संपूर्ण इमारत त्याच्याद्वारे जोडली गेली आणि प्रभूमध्ये पवित्र भवन होण्यासाठी वाढत आहे. 22त्याच्यामध्ये तुम्हीसुद्धा इतरांबरोबर देवाच्या आत्म्याद्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र बांधले जात आहात.

Currently Selected:

इफि. 2: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in