YouVersion Logo
Search Icon

अनु. 4

4
लोकांनी आज्ञाधारक असावे असा मोशेचा उपदेश
1आता अहो इस्राएल लोकहो, मी जे नियम आणि आज्ञा सांगतो त्या नीट ऐकून घ्या. त्यांचे पालन केलेत तर जिवंत रहाल आणि तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर जो देश तुम्हास देणार आहे त्याचा ताबा घ्याल. 2माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही कमी किंवा अधिक असे काही करु नका. अशासाठी की, तुमचा देव ह्याच्या ज्या आज्ञा मी तुम्हास देत आहे. त्या तुम्ही पाळाव्या. 3बआल-पौराच्या विषयी परमेश्वराने काय केले हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहीले आहे; जे बआल-पौराच्या नादी लागले त्यांना तुमचा देव परमेश्वर याने तुमच्यामधून नष्ट केले आहे. 4परंतु तुमचा देव परमेश्वर याच्याशी जे जडून राहिले ते तुम्ही आज जिवंत आहा. 5पाहा माझा देव परमेश्वर याने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हास शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घेण्यास जात आहात तेथे तुम्ही ते पाळावे म्हणून मी ते सांगितले. 6त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासीयांना कळेल. हे नियम ऐकून ते म्हणतील, खरेच, हे महान राष्ट्र बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे. 7आपण आपला देव परमेश्वर ह्याचा धावा करतो तेव्हा तो आपल्या जवळच असतो, असे देव जवळ असणारे महान राष्ट्र दूसरे कोणते आहे? 8ज्या विधी आणि नियमांची शिकवण मी तुम्हास दिली तसे नियमशास्त्र असणारे दुसरे राष्ट्र तरी कोठे आहे? 9पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाहीतर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरून जाल. आपल्या मुला-नातवंडांना त्याची माहिती द्या. 10ज्या दिवशी तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी तुमचा देव परमेश्वर याच्यामोर उभे होता, तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव, म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल भय बाळगतील. आपल्या मुलाबाळांनाही तशीच शिकवण देतील. 11मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाला आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ट ढग आणि अंधार पसरला होता. 12परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हास आवाज ऐकू आला पण तुम्ही कोणती आकृतीही पाहीली नाही, फक्त वाणी ऐकू आली. 13परमेश्वराने आपला करार करून तुम्हास सांगितले. त्याने तुम्हास दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हास आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या. 14त्याचवेळी तुम्ही ज्या देशात वस्ती करणार होता, तेथे पाळण्यासाठी आणखीही काही विधी नियम परमेश्वराने मला तुम्हास शिकवण्यास सांगितले.
मूर्तीपूजेविरुद्ध ताकीद
15होरेब पर्वतावरुन अग्नीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्यादिवशी तो तुम्हास दिसला नाही. कारण त्यास कोणताही आकार नव्हता. 16तेव्हा जपून असा. कोणत्याही सजीवाची प्रतिमा किंवा खोटी दैवते उभारण्याचे पाप करून स्वत:ला बिघडवू नका. स्त्री किंवा पुरुषासारखी दिसणारी मूर्ती करु नका. 17जमिनीवरील संचार करणारे प्राणी किंवा आकाशात उडणारा पक्षी, 18जमिनीवर सरपटणारा जीव किंवा समुद्रातील मासा अशासारख्या कशाचीही प्रतीमा करू नका. 19तसेच आकाशातील सूर्य, चंद्र, तारे आणि इतर गोष्टी पाहाताना हबकून जावू नका. त्यांच्यापुढे लोटांगण घालून त्यांची उपासना करु नका. या गोष्टी तुमचा देव परमेश्वर याने आकाशाखालील सर्व लोकांस देऊन ठेवल्या आहेत. 20पण तुम्हास परमेश्वराने मिसर देशाबाहेर आणले आणि तुम्हास स्वत:चे खास लोक केले. जणू लोखंड वितळविन्याच्या धधगत्या भट्टीतून त्याने तुम्हास बाहेर काढले आणि तुम्ही त्याच्या वतनाचे लोक आहा! 21तुमच्यामुळे परमेश्वराचा माझ्यावर कोप झाला व त्याने शपथेने सांगितले की मी यार्देन नदीपलीकडे पाऊल ठेवू शकणार नाही. तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिलेल्या वतनात तुम्ही प्रवेश करणार आहात, तेथे मला प्रवेश नाही. 22त्यामुळे मी येथेच देह ठेवणार आहे. मी यार्देन नदीपलीकडे येऊ शकत नसलो तरी तुम्ही तो चांगला प्रदेश ताब्यात घ्या. 23तेथे तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्याशी केलेला पवित्र करार विसरू नका व त्याच्या आज्ञा पाळा. कोणत्याही प्रकारे कोणत्याही आकाराची मूर्ती करु नका. 24कारण मूर्तीपूजेचा त्यास तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे. 25तुम्हास पुत्रपौत्र होऊन त्या देशात तुम्ही दीर्घकाळ राहिल्यावर जर तुम्ही बिघडून कोणत्याही वस्तूची कोरीव मूर्ती कराल आणि आपला देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने जे वाईट ते कराल तर त्यास क्रोध येईल. 26तर आज मी तुम्हास सावध करत आहे; याला स्वर्ग आणि पृथ्वी साक्षी आहेत, ज्या देशाचे वतन मिळवायला तुम्ही यार्देन नदी ओलांडून जात आहात तेथून तुमचा लवकरच अगदी नायनाट होईल; तेथे तुम्ही फार दिवस राहणार नाहीत, पण तुमचा समूळ नाश होईल. 27परमेश्वर देव तुम्हास वेगवेगळ्या राष्ट्रात विखरून टाकील. आणि जेथे जेथे तो पाठवील तेथे तुमची संख्या अगदीच अल्प राहील. 28तेथे तुम्ही मनुष्यांनी घडवलेल्या दगडी अगरलाकडी दैवतांची, जे पाहू शकत नाहीत, ऐकत नाहीत, खात नाहीत की वास घेत नाहीत अशांची सेवा कराल. 29परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वरास, आपल्या देवाला पूर्ण जिवेभावे शरण गेला तर तो तुम्हास पावेल. 30या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात पडाल तेव्हा तुम्ही पुन्हा आपला देव परमेश्वर ह्याच्याकडेच परतून याल व त्यास शरण जाल. 31आपला देव परमेश्वर दयाळू आहे. तो तुम्हास अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने शपथपूर्वक केलेला करार तो विसरणार नाही. 32असा चमत्कार कधी घडला आहे का? कधीच नाही. पूर्वीचे आठवून बघा. तुमच्या जन्मा आधीपासूनच्याही सर्व गोष्टी आठवा. देवाने पृथ्वीवर मनुष्य निर्माण केला. तेव्हापासून आजपर्यंत जगाच्या कानाकोपऱ्यात घडलेल्या सर्व गोष्टी पाहा. असा महान चमत्कार कोणाच्या ऐकण्यात तरी आहे का? 33अग्नीमधून साक्षात देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतीत घडले आहे? 34दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या देवाने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने मिसर देशात तुमच्यासाठी महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले, त्याने तुमच्यासाठी संकटे, चिन्हे, चमत्कार, युद्धे, पराक्रमी हात आणि उगारलेला भूज ह्याद्ववारे भयप्रद कार्ये केली. 35परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हास कळावे म्हणून त्याने तुम्हास हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. 36तुम्हास शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले. 37त्याचे तुमच्या पूर्वजांवर प्रेम होते. म्हणून त्याने तुमची निवड केली. त्यामुळेच त्याने तुम्हास आपल्या महान सामर्थ्याने मिसर देशातून बाहेर आणले. तो तुमच्या पाठीशी राहिला. 38तुम्ही जसे पुढे जाल तसे त्याने तुमच्यापेक्षा मोठ्या व समर्थ राष्ट्रांना हुसकून लावले आणि तेथे तुमचा शिरकाव करून दिला. त्यांचा प्रदेश त्याने तुम्हास राहण्यासाठी दिला. आजही तो हे करत आहे. 39तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा. 40आज मी तुम्हास त्याचे नियम व आज्ञा सांगणार आहे, त्या पाळा. त्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे भले होईल. तुमच्या परमेश्वर देवाने दिलेल्या प्रदेशात तुमचे वास्तव्य दीर्घकाळ राहील. तो प्रदेश कायमचा तुमचाच होईल.
यार्देनेच्या पूर्वेस असलेली शरणपुरे
41मग मोशेने यार्देन नदीच्या पूर्वेला तीन नगरांची निवड केली. 42अशासाठी की, पूर्वी काही वैर नसताना, अजाणतेपणी एखाद्याने कोणाची चुकून हत्या केली तर त्यास ह्यातल्या एखाद्या नगराचा आसरा घेता यावा. मृत्यूदंडाला सामोरे जावे लागू नये. 43ती नगरे अशी: रऊबेन वंशासाठी रानातील माळावरचे बेसेर नगर, गाद वंशासाठी गिलाद प्रदेशातील रामोथ नगर आणि मनश्शेच्या वंशासाठी बाशान प्रदेशातील गोलान नगर.
परमेश्वराने घालून दिलेल्या नियमांच्या कथनाची प्रस्तावना
44इस्राएल लोक मिसर देशातून बाहेर पडल्यावर मोशेने त्यांना हे नियमशास्त्र, दिले. 45इस्राएली लोक मिसरातून बाहेर आले तेव्हा मोशेने हे निर्बंध सांगितले. ते बेथपौरच्या समोरच्या खोऱ्यात यार्देन नदीच्या पूर्वेला होते. 46म्हणजेच हेशबोन नगरातील अमोऱ्यांचा राजा सीहोन याला पराजित केले त्याच्या देशात यार्देनेच्या पूर्वेस म्हणजे बेथ-पौराच्या समोरील खोऱ्यात (मोशे आणि इस्राएलाच्या लोकांनी मिसर देशातून बाहेर पडल्यावर सीहोनचा पराभव केला होता.) 47त्यांनी हा देश आणि बाशानाचा राजा ओग याचाही देश ताब्यात घेतला. अमोऱ्यांचे हे दोन्ही राजे यार्देन नदीच्या पूर्वेकडे राहत असत. 48आर्णोन खोऱ्याच्या सीमेवरील अरोएर नगरापासून सरळ सिर्योन (म्हणजेच हर्मोन) पर्वतापर्यंत हा प्रदेश पसरलेला आहे. 49यार्देन नदीच्या पूर्वेकडील संपूर्ण खोरे, दक्षिणेला अराबा (मृत) समुद्रापर्यंतचा विस्तार, आणि पूर्वेला पिसगा पर्वताच्या पायथ्यापर्यंत एवढा हा प्रदेश त्यांनी काबीज केला होता.

Currently Selected:

अनु. 4: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in