YouVersion Logo
Search Icon

2 करिं. 7

7
1प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.
तिताच्या येण्याने झालेले सांत्वन
2तुम्ही आमचा अंगिकार करा; आम्ही कोणावर अन्याय केला नाही, कोणाला बिघडवले नाही, कोणाचा गैरफायदा घेतला नाही. 3दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की, तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतःकरणात आहात. 4मला तुमचा मोठा विश्वास आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पूरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखात मी अतिशय आनंदीत आहे.
5कारण आम्ही मासेदोनियास आल्यावर आमच्या शरीराला स्वास्थ्य नव्हते; आम्हास सगळीकडून त्रास देण्यात आला, बाहेरून भांडणे व आतून भीती. 6तरीही, जो देव लीन अवस्थेत असलेल्यांचे सांत्वन करतो त्याने आमचे तीताच्या येण्याकडून सांत्वन केले. 7आणि केवळ त्याच्या येण्यामुळे नाही, पण तो जेव्हा तुमची उत्कंठा, तुमचा शोक व तुमची माझ्याविषयीची तीव्र सदिच्छा ह्यांविषयी आम्हास सांगत होता तेव्हा तुमच्याबाबतीत त्याचे जे सांत्वन झाले त्याच्या योगाने आमचे सांत्वन होऊन मला विशेष आनंद झाला. 8मी माझ्या पत्राने तुम्हास दुःख दिले ह्याबद्दल मला वाईट वाटत नाही; मला वाईट वाटले होते कारण मला दिसले होते की त्या पत्राने जणू घटकाभर, तुम्हास दुःखी केले होते; 9तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. 10कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. 11कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते, या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, उत्पन्न झाली! या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे. 12तथापि मी तुम्हास लिहिले ते ज्याने अन्याय केला त्याच्यामुळे नव्हे आणि ज्यावर अन्याय झाला त्याच्यामुळेही नव्हे, तर आमच्याविषयी तुम्ही दाखवत असलेल्या कळकळीची जाणीव तुम्हास देवासमक्ष व्हावी म्हणून लिहीले.
13ह्यामुळे आमचे सांत्वन झाले आहे आणि आमचे सांत्वन इतकेच नव्हे, तर विशेषकरून तीताला आनंद झाल्यामुळे आम्हीही फारच आनंदित झालो; कारण तुम्हा सर्वांकडून त्याच्या मनाला स्वस्थता मिळाली. 14आणि तुमच्याविषयी त्याच्यापुढे मी जर अभिमान मिरवला असेल तर मला काही लाज वाटत नाही. पण आम्ही ज्याप्रमाणे तुमच्याबरोबर सर्वकाही खरेपणाने बोलतो, त्याचप्रमाणे तीतापुढील तुम्हाविषयीचा आमचा अभिमान खरेपणाचा आढळला आहे. 15तुमच्या सर्वांच्या आज्ञांकितपणाची म्हणजे तुम्ही भय धरून, कापत कापत, त्याचे कसे स्वागत केले याची त्यास आठवण होत असता तुमच्यासाठी त्याची ममता फारच फार आहे. 16मला सर्वबाबतीत तुमचा विश्वास वाटतो म्हणून मी आनंद करतो.

Currently Selected:

2 करिं. 7: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in