YouVersion Logo
Search Icon

2 करिं. 3

3
ख्रिस्तानुयायीच पौलाची शिफारस पत्र
1आम्ही पुन्हा आमची स्वतःची प्रशंसा करू लागलो आहोत काय? किंवा आम्हास, दुसर्‍यांप्रमाणे, तुमच्याकरिता किंवा तुमच्याकडून शिफारसपत्रांची गरज आहे काय? 2तुम्ही स्वतःच आमची शिफारसपत्रे आहात; आमच्या अंतःकरणावर लिहिलेले, प्रत्येकाने वाचलेले व प्रत्येकाला माहीत असलेले. 3शाईने नव्हे, तर जिवंत देवाच्या आत्म्याने कोरलेले दगडी पाट्यांवर नव्हे, तर मानवी मांसमय हृदयाच्या पाट्यांवर कोरलेले, आमच्या सेवेच्या योगे तयार झालेले ख्रिस्ताचे पत्र आहात, असे तुम्ही दाखवून देता.
4आणि ख्रिस्तामुळे देवाच्या ठायी आमचा असा विश्वास आहे. 5आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होऊनच ठरविण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमच्या अंगची पात्रता देवाकडून आलेली आहे. 6त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.
नियमशास्त्र वैभवापेक्षा शुभवृत्त वैभव अधिक तेजस्वी
7पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती. 8तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? 9कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार. 10इतकेच नव्हे, तर “जे तेजस्वी होते ते” या तुलनेने हीनदीन ठरले. 11कारण जे नाहीसे होणार होते ते जर तेजयुक्त आहे, तर जे शाश्वत ते कितीतरी अधिक तेजस्वी असणार.
12तर मग आम्हास अशी आशा असल्यामुळे आम्ही फार धिटाईने बोलतो. 13आम्ही मोशेप्रमाणे करीत नाही; त्याने तोंडावर आच्छादन घातले ते ह्यासाठी की, जे नाहीसे होत चालले होते ते इस्राएल लोकांस शेवटपर्यंत बघता येऊ नये. 14पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे. 15पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते. 16पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल. 17आणि प्रभू आत्मा आहे व जेथे प्रभूचा आत्मा आहे तेथे मोकळेपणा आहे. 18पण आपल्या तोंडावर आच्छादन नसून आपण सर्वजण, जणू आरशात पाहिल्याप्रमाणे, प्रभूच्या तेजाकडे पाहत असता, कलेकलेने त्याच्या प्रतिरूपात आपले रूपांतर होत आहे. हे प्रभूच्या आत्म्याकडून होत आहे.

Currently Selected:

2 करिं. 3: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in