YouVersion Logo
Search Icon

1 शमु. 30

30
दावीद अमालेक्यांचा पराभव करतो
1असे झाले की, दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर व सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलागचा पाडाव करून ते अग्नीने जाळले होते. 2त्यातल्या स्त्रिया व त्यामध्ये जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते; त्यांनी कोणालाही जिवे मारले नव्हते, पण त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले. 3तर दावीद व त्याची माणसे नगराजवळ आली तेव्हा पाहा ते अग्नीने जाळलेले आहे आणि त्यांच्या स्त्रिया आणि त्यांचे पुत्र व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले. 4तेव्हा दावीद व त्याच्याजवळचे लोक हेल काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. 5दावीदाच्या दोघी स्त्रिया अहीनवाम इज्रेलीण व पूर्वी नाबाल कर्मेली याची पत्नी होती ती अबीगईल या धरून नेलेल्या होत्या. 6तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्यास धोंडमार करावा असे लोक बोलू लागले; कारण सर्व मनुष्यांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दु:खित झाले होते; परंतु दावीदाने आपला देव परमेश्वर याच्याकडून आपणाला सशक्त केले. 7मग दावीद अहीमलेखाचा मुलगा अब्याथार याजक याला म्हणाला, एफोद माझ्याकडे आण. मग अब्याथाराने एफोद दावीदाकडे आणले. 8दावीदाने परमेश्वरास विचारले, तो म्हणाला, “जर मी या सैन्याच्या पाठीस लागलो तर मी त्यांना गाठेन काय?” त्याने त्यास उत्तर दिले की, “पाठीस लाग कारण खचित तू त्यांना गाठशील व सर्वांना सोडवून घेशील.” 9मग दावीद त्याच्याकडील सहाशे पुरुष घेऊन बसोर नदीजवळ पोहचला. जे मागे ठेवले होते ते तेथे राहिले. 10तेव्हा दावीद व चारशे माणसे शत्रूच्या पाठीस लागली. कारण दोनशे माणसे तेथे थांबली; ती इतकी थकली होती की त्यांच्याने बसोर नदीच्या पलीकडे जाववेना. 11रानांत एक मिसरी त्यांना आढळला. तेव्हा त्यांनी त्यास दावीदाकडे आणले. मग त्यांनी त्यास भाकर दिली आणि ती त्याने खाल्ली व त्यांनी त्यास पाणी पाजले. 12मग त्यांनी अंजिराच्या ढेपेचा तुकडा व द्राक्षाचे दोन घड त्यास दिले मग त्याने खाल्ल्यावर त्याच्या जिवात जीव आला कारण तीन दिवस व तीन रात्री त्याने भाकर खाल्ली नव्हती पाणीही तो प्याला नव्हता. 13तेव्हा दावीद त्यास म्हणाला, “तू कोणाचा? कोठला आहेस?” त्याने म्हटले, “मी मिसरी तरुण एका अमालेकी मनुष्याचा चाकर आहे: तीन दिवसामागे मी दुखण्यात पडलो म्हणून माझ्या धन्याने मला सोडले. 14आम्ही करेथी यांच्या दक्षिण प्रदेशावर व यहूदाच्या प्रांतावर व कालेबाच्या दक्षिण प्रदेशावर घाला घातला आणि सिकलाग आम्ही अग्नीने जाळले.” 15मग दावीद त्यास म्हणाला, “तू मला या टोळीकडे खाली नेशील काय?” त्याने म्हटले, “तुम्ही मला जिवे मारणार नाही व माझ्या धन्याच्या हाती मला देणार नाही अशी देवाची शपथ माझ्याशी वाहा म्हणजे मी तुम्हास या टोळीकडे खाली नेईन.” 16त्याने त्यांना खाली नेले, तेव्हा पाहा ते लोक अवघ्या भूमीवर पसरून खात व पीत व नाचत होते कारण त्यांनी पलिष्ट्यांच्या देशातून व यहूद्याच्या देशातून पुष्कळ लूट घेतली होती. 17दावीद पहाटेपासून दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत त्यांना मारीत गेला; त्यांच्यातील चारशे तरुण माणसे उंटावर बसून पळाली. त्यांच्याशिवाय त्यांच्यातला कोणीएक सुटला नाही. 18जे सर्व अमालेक्यांनी नेले होते ते दावीदाने सोडवले व आपल्या दोघी स्त्रिया सोडवल्या. 19लहान किंवा मोठा, मुले किंवा मुली व लूट किंवा जे सर्व त्यांनी नेले होते त्यातले काहीच त्यांनी गमावले नाही; दावीदाने सर्व माघारी आणले. 20अवघी मेंढरे व गुरे दावीदाने घेतली; ती त्यांनी इतर सामानापुढे हाकून म्हटले, “ही दावीदाची लूट आहे.” 21मग जी दोनशे माणसे थकल्यामुळे दावीदाच्या मागे गेली नाहीत, ज्यांना त्याने बसोर नदीपाशी ठेवले होते, त्यांच्याकडे दावीद आला तेव्हा ती दावीदाला भेटायला व त्यांच्याबरोबरच्या लोकांस भेटायला सामोरी आली आणि दावीदाने त्या मनुष्यांजवळ येऊन त्यांना त्यांचे कुशल विचारले. 22तेव्हा जी माणसे दावीदाबरोबर गेली होती त्यांच्यापैकी जी वाईट व दुष्ट होती. ती सर्व असे म्हणू लागली की, “ही माणसे आम्हाबरोबर आली नाहीत म्हणून जी लूट आम्ही सोडवली तिच्यातले काही आम्ही त्यांना देणार नाही; फक्त प्रत्येकाला ज्याची त्याची बायकापोरे मात्र देऊ. मग त्यांनी ती घेऊन निघून जावे.” 23तेव्हा दावीद म्हणाला, “माझ्या भावांनो जे परमेश्वराने आम्हांला दिले आहे त्याचे असे करू नका. कारण त्याने आम्हास संभाळले व जी टोळी आम्हावर आली ती आमच्या हाती दिली. 24या गोष्टीविषयी तुमचे कोण ऐकेल? जो लढाईत गेला त्याचा जसा वाटा तसा जो सामानाजवळ राहतो त्याचा वाटा होईल; त्यांना सारखाच वाटा मिळेल.” 25त्या दिवसापासून पुढे तोच नियम झाला; त्याने तसा नियम व रीत इस्राएलात आजपर्यंत करून ठेवली. 26दावीद सिकलागास आला तेव्हा त्याने यहूदाच्या वडिलांकडे आपल्या मित्रांकडे लुटीतले काही पाठवून सांगितले की, “पाहा परमेश्वराच्या शत्रूंच्या लुटीतून तुम्हास ही भेट आहे.” 27जे बेथेलात होते त्यांना जे दक्षिण प्रदेशातील रामोथात होते त्यांना, व जे यत्तीरात होते त्यांना; 28जे अरोएरात होते त्यांना, व जे सिफमोथात होते त्यांना, व जे एष्टमोत होते त्यांना, 29जे राखासांत होते त्यांना, व जे येरहमेली यांच्या नगरांत होते त्यांना, व जे केनी यांच्या नगरांत होते त्यांना, 30जे हर्मात होते त्यांना, व जे कोराशानात होते त्यांना, व जे अथाखात होते त्यांना, 31आणि जे हेब्रोनात होते त्यांना, जेथे दावीद व त्याची माणसे फिरत असत त्या सर्व ठिकाणाकडे त्याने लुटीतले काही पाठवले.

Currently Selected:

1 शमु. 30: IRVMar

Highlight

Share

Copy

None

Want to have your highlights saved across all your devices? Sign up or sign in