गिलाद्यांनी एफ्राइमी लोकांना अडवण्यासाठी यार्देनेचे उतार रोखून धरले. आणि कोणी एफ्राइमी पळपुट्या त्यांना म्हणे, “मला पलीकडे जाऊ द्या,” तेव्हा गिलादी लोक त्याला विचारत, “तू एफ्राइमी आहेस काय?”
त्याने “नाही” असे म्हटले तर ते त्याला म्हणत, “शिब्बोलेथ म्हण”; तेव्हा तो “सिब्बोलेथ” म्हणे. त्या शब्दाचा उच्चार त्याला करता येत नसे म्हणून ते त्याला धरून यार्देनेच्या उताराजवळ मारून टाकत. त्या प्रसंगी एफ्राइमातले बेचाळीस हजार प्राणास मुकले.