उत्प. 9

9
देवाचा नोहाशी करार
1नंतर देवाने नोहाला व त्याच्या मुलांना आशीर्वाद दिला आणि म्हटले, “फलदायी व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी भरून टाका. 2पृथ्वीवरील प्रत्येक जिवंत प्राणी, आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे सर्व प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे ह्यांच्यावर तुमचे भय व धाक राहील; ते तुमच्या कह्यात दिले आहेत. 3प्रत्येक हालचाल करणारा प्राणी हा तुमचे अन्न होईल. जशा मी हिरव्या वनस्पती दिल्या आहेत, तसेच आता सर्वकाही तुम्हास देत आहे. 4पण ज्यामध्ये त्याचे जीवन म्हणजे रक्त आहे, ते मांस तुम्ही खाऊ नये. 5परंतु तुमच्या रक्तासाठी, जे रक्त तुमचे जीवन आहे, त्याबद्दल मी आवश्यक भरपाई घेईन. प्रत्येक प्राण्याच्या हातून मी ती घेईन. मनुष्याच्या हातून, म्हणजे ज्याने आपल्या भावाचा खून केला आहे त्याच्या हातून, त्या मनुष्याच्या जिवाबद्दल मी भरपाईची मागणी करीन. 6जो कोणी मनुष्याचे रक्त पाडतो, त्याचे रक्त मनुष्याकडून पाडले जाईल, कारण देवाने मनुष्यास त्याच्या प्रतिरूपाचे बनवले आहे. 7तुम्ही मात्र फलदायी आणि बहुगुणित व्हा, सर्व पृथ्वीवर विस्तारा, आणि तिच्यावर बहुगुणित व्हा.” 8मग देव नोहाला व त्याच्या मुलांना म्हणाला, 9“माझे ऐका! मी तुमच्याशी व तुमच्या नंतर तुमच्या वंशजाशी एक करार स्थापन करतो, 10आणि तुमच्याबरोबर असलेले सर्व जिवंत प्राणी, म्हणजे तुमच्याबरोबर तारवातून बाहेर आलेले पक्षी, गुरेढोरे, आणि पृथ्वीवर राहणारे सर्व प्राणी त्यांच्याशीही एक करार स्थापित करतो. 11अशा प्रकारे मी तुमच्याशी करार स्थापित करतो की, यापुढे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देह पुन्हा कधीही नष्ट केले जाणार नाहीत व पुन्हा कधीही पुराने पृथ्वीचा नाश होणार नाही.” 12देव म्हणाला, “मी माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, व तुमच्याबरोबर जे सर्व जिवंत जीव आहेत त्यांच्यामध्ये भावी पिढ्यानपिढ्यासाठी हा करार केल्याची निशाणी हीच आहे. 13मी ढगात मेघधनुष्य ठेवले आहे; ते सर्व पृथ्वी व माझ्यामध्ये केलेल्या कराराची निशाणी आहे. 14मी जेव्हा पृथ्वीवर ढग आणीन तेव्हा तुम्हास ढगात मेघधनुष्य दिसेल, 15नंतर मी ते पाहीन तेव्हा मी तुमच्याशी व पृथ्वीवरील सर्व देहातल्या जिवंत प्राण्यांशी केलेल्या माझ्या कराराची मला आठवण होईल, या कराराप्रमाणे पुराच्या पाण्याने पृथ्वीवरील सर्व देहाचा पुन्हा कधीही नाश करणार नाही. 16मेघधनुष्य ढगात राहील आणि जो सर्वकाळचा करार देव आणि पृथ्वीवरील सर्व देहातले जिवंत प्राणी यांच्यामध्ये आहे त्याची आठवण म्हणून मी त्याकडे पाहीन.” 17नंतर देव नोहाला म्हणाला, “हे मेघधनुष्य माझ्यामध्ये व पृथ्वीवरील सर्व देहांमध्ये स्थापित केलेल्या कराराची निशाणी आहे.”
नोहा आणि त्याचे पुत्र
18नोहाबरोबर त्याचे पुत्र तारवाबाहेर आले; त्यांची नावे शेम, हाम व याफेथ अशी होती. आणि हाम हा कनानाचा पिता होता 19हे नोहाचे तीन पुत्र होते, आणि यांच्यापासूनच सर्व पृथ्वीवर लोकविस्तार झाला. 20नोहा शेतकरी बनला, आणि त्याने एक द्राक्षमळा लावला. 21तो थोडा द्राक्षरस प्याला आणि तो धुंद झाला. तो त्याच्या तंबूत उघडा-वाघडा पडला होता. 22तेव्हा कनानाचा पिता हाम याने आपला पिता उघडा-वागडा पडलेला असल्याचे पाहिले व त्याने तंबूच्या बाहेर येऊन ते आपल्या भावांना सांगितले. 23मग शेम व याफेथ यांनी एक कपडा घेतला व तो आपल्या खांद्यावर ठेवून ते पाठमोरे तंबूत गेले. अशा प्रकारे त्यांनी आपल्या पित्याची नग्नता झाकली; पाठमोरे असल्यामुळे ती त्यांना दिसली नाही. 24जेव्हा नोहा नशेतून जागा झाला, तेव्हा आपला धाकटा मुलगा हाम याने काय केले हे त्यास समजले. 25तेव्हा नोहा म्हणाला, “कनान शापित होवो, तो आपल्या भावाच्या गुलामातील सर्वांत खालचा गुलाम होवो.” 26तो म्हणाला,
“शेमाचा देव परमेश्वर धन्यवादित असो.
कनान त्याचा सेवक होवो.
27देव याफेथाचा अधिक विस्तार करो,
आणि शेमाच्या तंबूत तो त्याचे घर करो.
कनान त्यांचा सेवक होवो.”
28पूरानंतर नोहा तीनशे पन्नास वर्षे जगला; 29नोहा एकूण नऊशें पन्नास वर्षे जगला; मग त्यानंतर तो मरण पावला.

Цяпер абрана:

उत्प. 9: IRVMar

Пазнака

Падзяліцца

Капіяваць

None

Хочаце, каб вашыя адзнакі былі захаваны на ўсіх вашых прыладах? Зарэгіструйцеся або ўвайдзіце