उत्पत्ती 8

8
1परमेश्वराने नोआह आणि तारवातील सर्व पाळीव व वन्यप्राण्यांचे स्मरण केले. त्यांनी पृथ्वीवरून वाहण्यासाठी वारा पाठविला आणि पुराचे पाणी ओसरू लागले. 2पृथ्वीतलातील पाण्याचे झरे उफाळण्याचे थांबले आणि आकाशातील जलप्रलयाची दारे बंद झाली, आकाशातून पडणारा पाऊसही थांबला. 3पृथ्वीवरून पाणी सतत कमी होत गेले. दीडशे दिवस उलटल्यानंतर पाणी ओसरले. 4आणि सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी तारू अरारात पर्वतावर स्थिरावले. 5पाणी ओसरू लागले व दहाव्या महिन्यापर्यंत पाणी सतत ओसरत होते आणि दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वतांची शिखरे दिसू लागली.
6आणखी चाळीस दिवसानंतर नोआहने तारवात बनविलेली खिडकी उघडली 7आणि त्याने एक कावळा बाहेर सोडला. तो पृथ्वीवरील सर्व पाणी ओसरेपर्यंत तारवातून येणे जाणे करीत होता. 8दरम्यान नोआहने एका कबुतराला, पृथ्वीवरील पाणी ओसरले की नाही हे पाहण्यासाठी बाहेर सोडले. 9परंतु ते कबुतर त्याच्याकडे परत आले, कारण अजूनही पाणी पृथ्वीवर बरेच वर असल्यामुळे त्याला उतरावयाला कुठेही जागा मिळाली नाही. म्हणून नोआहने आपला हात बाहेर काढून कबुतराला परत तारवात घेतले. 10आणखी सात दिवस थांबून नोआहने तारवातून ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले. 11संध्याकाळी कबुतर जेव्हा त्याच्याकडे परत आले, तेव्हा त्याच्या चोचीत एक ताजे जैतुनाचे पान होते! मग नोआहला समजले की पृथ्वीवरून पाणी ओसरले आहे. 12मग आणखी सात दिवस थांबून त्याने ते कबुतर पुन्हा बाहेर सोडले, परंतु यावेळी ते परत आले नाही.
13नोआहच्या सहाशे एकाव्या वर्षी, पहिल्या वर्षाच्या, पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, पृथ्वीवरील पाणी वाळले. मग नोआहने तारवाचे दार उघडून बाहेर पाहिले, तेव्हा पृथ्वी कोरडी झाल्याचे त्याला दिसून आले. 14दुसर्‍या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवसापर्यंत पृथ्वी पूर्णपणे कोरडी झाली.
15मग परमेश्वराने नोआहला सांगितले, 16“तू आणि तुझी पत्नी, तुझे पुत्र व त्यांच्या पत्नी असे सर्वांनी तारवाच्या बाहेर यावे. 17प्रत्येक प्रकारचा सजीव प्राणी—पक्षी, पशू, सरपटणारे सर्व प्राणी—यांनाही बाहेर आणावे, म्हणजे त्यांची भरभराट होईल आणि ते फलद्रूप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील.”
18मग नोआह, त्याचे पुत्र व त्याची पत्नी आणि पुत्रांच्या पत्नी हे तारूच्या बाहेर आले. 19यांच्याबरोबर पशू, सरपटणारे प्राणी व पक्षी—भूमीवर वावरणारे सर्वप्रकारचे प्राणी तारवातून उतरले.
20मग नोआहने याहवेहसाठी एक वेदी बांधली आणि त्याने शुद्ध पक्ष्यांतून काही आणि शुद्ध पशूतून काही घेतले आणि त्यांचे वेदीवर होमार्पण केले. 21तेव्हा याहवेह अर्पणाच्या सुगंधाने संतुष्ट झाले आणि आपल्या अंतःकरणात म्हणाले: “जरी लहानपणापासून मानवी हृदयाची प्रत्येक प्रवृत्ती वाईट आहे तरी मी मनुष्यामुळे जमिनीला पुन्हा कधी शाप देणार नाही आणि जसा मी केला आहे, तसा सर्व जिवंत प्राण्यांचा नाश यापुढे कधीही करणार नाही.
22“पृथ्वी अस्तित्वात आहे,
तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ,
थंडी व उष्णता,
हिवाळा व उन्हाळा,
दिवस व रात्र
ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

Kleurmerk

Deel

Kopieer

None

Wil jy jou kleurmerke oor al jou toestelle gestoor hê? Teken in of teken aan

Video vir उत्पत्ती 8